सातारा : खंडाळा येथील रियटर इंडिया कंपनीत ३५५ पेक्षा अधिक कामगारांनी एकत्र येऊन दिनांक ०५/०८/२०२१ रोजी रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन नावाची नोंदणीकृत संघटना स्थापन केली. रियटर इंडिया कंपनीतील कामगार विविध मागण्यासाठी दि.२१ जानेवारी २०२३ पासून संपावर जाणार आहेत अशी माहिती रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन कामगार संघटनेमार्फत देण्यात आली.
कामगाऱ्यांच्या विविध समस्या व मागण्या पुढीलप्रमाणे -
- युनियनने पगार वाढ व इतर मागण्यांचे मागणी पत्र ऑगस्ट 2021 रोजी कंपनीकडे सादर केले असून व्यवस्थापनाने सदर मागण्यांची दखल न घेतल्याने सदर प्रकरण मा. औद्योगिक न्यायालय सातारा येथे न्याय प्रविष्ट आहे.
- युनियन मध्ये ३५५ पेक्षा अधिक सभासद असताना सदर युनियन डावलली जात आहे सदर प्रकरण मा. उच्च न्यायालय मध्ये प्रलंबित आहे.
- सदर कंपनी व्यवस्थापनाने ५०० हून अधिक कंत्राटी कामगारांच्या बेकायदेशीर नेमणुकी केल्या आहेत. सदर नेमणुकी ह्या कंत्राटी कामगार कायदा,१९७० तसेच सदर कायद्यामधील नियमांच्या विरुद्ध असल्याने त्या बाबत युनियनने दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजीच्या पत्राने सहाय्यक कामगार आयुक्त, सातारा, यांचेकडे त्याबाबत तक्रार केली आहे.सदर तक्रारी नुसार कंत्राटी कामगारांची तपासणी करण्याचे आदेश मा. कामगार आयुक्त, मुंबई यांनी सहाय्यक कामगार आयुक्त, सातारा कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना देऊन सुद्धा सदर कंपनीतील कंत्राटी कामगारांची तपासणी झालेली नसल्याने कारवाई सुद्धा केली नाही.
- युनियन स्थापन झाल्या पासून सभासद असलेल्या कामगारांना लहान सहान बाबी वरून कारवाई केली जात असून युनियन मधून बाहेर पडण्याकरिता दबाव टाकला जातो.
- युनियन पदाधिकाऱ्यांना सभासद कामगारापासून दूर ठेवण्याच्या हेतूने त्यांना वारंवार राज्याबाहेर ट्रेनिंग च्या नावाखाली बदली केली जाते. ट्रेनिंग करिता केवळ युनियन पदाधिकाऱ्यांचीच बदली केली जाते.
अशा व विविध समस्या व मागणीसाठी युनियनने संपाचा निर्णय घेतला असून दिनांक २१ जानेवारी २०२३ पासून कंपनीतील सर्व कामगार संपावर जात आहेत अशी माहिती युनियनतर्फे देण्यात आली.