चिंचवड : येथील एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतील वरिष्ठ कामगार २०० दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. पाच जुलै रोजी या आंदोलनाचे दोनशे दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आंदोलन कामगारांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कामगार संघटना बदलल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने सुडबुद्धीने त्यांच्या हरियाणामध्ये बदलीचे आदेश दिले. कामगारांनी ते नाकारल्याने त्यांना कोणतीही खातेनिहाय चौकशी न करता सेवेतून बडतर्फ करण्यात आले. या कामगारांची सेवा १५ ते ३२ वर्षांदरम्यान असून, काहींच्या सेवानिवृत्तीला अवघे काही महिने उरले आहेत.
हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असून कामगारांनी तीन वर्षांपासून वेतनाशिवाय संघर्ष केला आहे. कुटुंबाच्या अन्नधान्य, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजा पूर्ण न होऊ शकल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणात कामगार आयुक्त कार्यालयाकडून कंपनीविरोधात सुमारे ५२ खटले सध्या न्यायालयात सुरू असून कंपनीकडून वेळकाढूपणा सुरू आहे.
विशेष म्हणजे, सदर आंदोलन सुरु असतानाही संबंधित कंपनी व्यवस्थापन यांच्याकडून ठोस भूमिका घेतली गेलेली नाही. आंदोलनाच्या २०० व्या दिवशी निमित्ताने आंदोलन कामगारांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिक आणि कामगार वर्गांनी आंदोलन स्थळी येऊन शिबिरात रक्तदान करून आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा ही विनंती आंदोलन करते कामगारांनी केली आहे.