शिरूर : रांजणगाव 'केअर इसेन्शिअल्स इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीने मशिनरी हलविण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त कामगारांनी दि.२५ जानेवारी पासून कंपनीच्या प्रवेशद्वारात ठिय्या दिला आहे. बेकायदा कंपनी बंद करून कामगारांना देशोधडीला लावण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप कामगारांनी केला. पगारवाढीची मागणी केल्याने कंपनीचा हा पलायनाचा प्रयत्न असल्याचेही कामगारांनी सांगितले असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
केअर इसेन्शिअल्स या कंपनीत साठ कायम कामगार असून, त्यापैकी ४५ कामगारांनी गेल्या चार दिवसांपासून कंपनीच्या प्रवेशद्वारात ठिय्या दिला आहे. यात महिलांची संख्या मोठी असून भर थंडीतही हे कामगार रात्रंदिवस तेथे थांबून आहेत. बुधवारी (ता. २५) रात्री दहा वाजताची शिफ्ट संपल्यानंतर सर्व कामगार आपापल्या घरी गेले असताना बाराच्या सुमारास कंपनी प्रशासनाने मशिनरी हलविण्याचा प्रयत्न केला. याची कुणकूण लागताच महिलांसह कामगार प्रवेशद्वारावर जमले व मशिनरी हलविण्यास विरोध केल्याने प्रशासन प्रवेशद्वाराला कुलूप लावून निघून गेले, अशी माहिती केअर इसेन्शिअल एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षा रोहिणी पोपट नवले यांनी दिली.
श्रमिक एकता महासंघाशी संलग्न कामगार युनियन असून, सन २०१५ पासून आम्ही कायम कामगार म्हणून कंपनीत काम करतो. कामगारांच्या पगाराचे सन २०१९ ते २०२२ चे वेतनकरार झाला. नव्याने वेतनवाढ साठी कामगारांची मागणी असताना ती प्रशासनाने धुडकावून लावल्याचा आरोप त्यांनी केला. कंपनी बंद करण्याबाबत, मशिनरी हलविण्याबाबत कुठलीही नोटीस न बजावता बेकायदा मशिनरी हलविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्याने कामगारांनी विरोध दर्शवून सनदशीर मागनि कंपनीच्या प्रवेशद्वारात ठिय्या केल्याचे उपाध्यक्ष भरत ढाक यांनी सांगितले.
आमचा रोजगार हिरावला जाऊ नये, भवितव्य अंधकारमय होऊ नये, यासाठी आम्ही शांततेच्या व सनदशीर मार्गाने ठिय्या आंदोलन करीत असल्याचे सचिव संभाजी केदारी, शारदा भोसले, विनीत गुप्ता यांनी सांगितले. आंदोलनाच्या माध्यमातून चार दिवस वाट पाहू. त्यानंतरही कंपनी चालू न झाल्यास बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा त्यांनी दिला.