जळगाव : कापड उद्योगात विश्वात ख्यातनाम ब्रॅण्ड असलेल्या रेमंड वस्त्रोद्योगाच्या जळगाव युनिटमध्ये शनिवार (ता. १०) रात्रीपासून कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.व्यवस्थापनातर्फे यंदा पगारवाढीवर करार नोटीस बजावली आहे. ती यंदाच्या महागाईच्या तुलनेत अत्यल्प आणि गेल्या वर्षाइतकीच असल्याचा आरोप कामगारांनी केला असून, आधी करारावर स्वाक्षरी करावी नंतरच कामाला सुरवात करावी, असे व्यवस्थापनाने ठरविल्याने अचानक कामबंद आंदोलन पुकारण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात रेमंड वस्त्रोद्योग कंपनीच्या युनिटमध्ये शनिवारी नाइट शिफ्टपासून कामबंद झाले आहे. परिणामी, आतील कर्मचारी आतच राहिले, तर नव्या शिफ्टसाठी आलेले कामगार बाहेर गेटवरच थांबून कामगारांनी दुतर्फा आंदोलनास प्रारंभ केला आहे.
आंदोलक कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगारांशी चर्चा न करता व्यवस्थापन समितीने एका संघटनेशी संगनमत करून अचानक कामगारांना नववर्षाच्या वेतनवाढीचा करार ठरवून घेतला आहे आणि त्या करारावर स्वाक्षरी केल्याशिवाय काम करता येणार नाही, असा पवित्रा व्यवस्थापन समितीने घेतला असून, कामगारांनी याला विरोध करत कामबंद आंदोलन पुकारल्याचे सांगण्यात आले.