शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय लिपिक वर्ग संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मुंबई : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय लिपिक वर्ग संघटनेचा ६४ वा वर्धापन दिन दिनांक २ ऑक्टोबर रोजी धुरु हाॅल,दादर, मुंबई येथे संघटनेचे आजी माजी सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांसह उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम गांधी जयंतीनिमित्त बापूजींच्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

     या सोहळ्यात संघटनेत कार्यकारी मंडळात १० वर्षे सातत्याने कार्य करणारे कार्यकर्ते, संघटना सदस्यत्वाची २५ वर्षे पूर्ण करणारे सभासद आणि कला, क्रिडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी सभासद पाल्यांच्या यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते अविनाश दौंड होते. त्यांनी गांधी विचारांचे आंतरराष्ट्रीय महत्व विशद करून लालबहादूर शास्त्री यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती दिली. याबरोबरच संघटना कार्याचे कौतुक केले. सद्यस्थितीत कामगारांच्या हक्कांची पायमल्ली होत असुन कडव्या संघर्षाला तयार रहावे.सर्व शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना मिळावी यासाठी नजिकच्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

    प्रमुख पाहुणे बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय लिपिक वर्ग संघटना ही एक आदर्श संघटना असून अविनाश दौंड यांच्या तालमीत तयार झालेले नवीन कार्यकर्ते उत्तम कार्य करत असल्याचे सांगितले. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय चव्हाण, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रमोद मोरे, मुद्रणालयीन सहकारी पतसंस्थेचे कार्याध्यक्ष विलास चव्हाण, सहकारी उपहारगृहाचे संचालक सुरेंद्र काशिद यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटना सरचिटणीस बाळकृष्ण तुरुंबाडकर, संचलन उपाध्यक्ष कमलेश खानविलकर आणि नंदकुमार सोनावणे यांनी तर आभार प्रदर्शन संघटनाध्यक्ष संतोष डोके यांनी केले.