श्रमिकांचे नेते व मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड कुमार शिराळकर यांना सीटू तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

नाशिक : मार्क्सवादी विचारवंत ,शेतमजूर कष्टकऱ्यांचे नेते कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे नाशिक येथे काल दि.२ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री साडेआठ वाजता निधन झाले, याबाबत महाराष्ट्र सीआयटीयू अतिव दुःख व्यक्त करीत आहे. १९७१ पासून अगदी तरुण वयापासुन ते नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींना संघटित करण्यासाठी कार्यरत होते. उच्चशिक्षित असूनही करिअर कडे न बघता आदिवासी श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रखर संघर्ष केले असे महाराष्ट्र राज्य सिटू अध्यक्ष डी एल कराड यांनी सांगितले

     पुढे बोलताना कराड म्हणाले कि, महाराष्ट्रातील आणि देशातील तरुणांचे ते मार्गदर्शक होते. एक मोठी पिढी त्यांच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे. शेतमजुरांचे अनेक लढे त्यांनी यशस्वीपणे लढले. वन कायदा 2005 आणि रोजगार हमी कायदा यांना अंतिम रूप देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. कामगार वर्गाशी त्यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे श्रमिक चळवळीचे, डाव्या पुरोगामी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे.

    शोषणमुक्त आणि भेदाभेद नसलेला समतेवर आधारलेला समाज  प्रस्थापित व्हावा यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. महाराष्ट्र सीआयटीयू त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे.