सणसवाडी ता. शिरूर : नवीन कामगार कायदे लवकरच महाराष्ट्रामध्ये लागू होऊ शकतात यामधील काही तरतुदी कामगार वर्गासाठी हानिकारक असून यामुळे कामगार देशोधडीला लागणार असून या नवीन कामगार कायद्यांचा धोका कामगारांसह शेतकरी, व्यापारी वर्गाला देखील आहे असे मत कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी मांडले.
सणसवाडी ता. शिरुर येथे (दि.१० सप्टेंबर) राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने कामगार, शेतकरी, व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी बोलताना राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले बोलत होते, याप्रसंगी मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शरद पाबळे, विविध मान्यवर पत्रकार, मोठ्याप्रमाणामध्ये कामगार वर्ग उपस्थित होता.
यावेळी भोसले म्हणाले कि, नवीन कामगार कायद्यामुळे कायमस्वरूपी कामगार हि संकल्पना संपुष्ठात येईल तसेच सध्या असणारे कायमस्वरूपी कामगारांना देखील कंपनी हवे तेव्हा कामावरून कमी करु शकते, तीनशे पेक्षा कमी कामगार संख्या असलेले कारखाने कारखानदार कधीही बंद करु शकतात त्यासाठी त्यांना शासनाच्या परवानगीची गरज नाही याप्रकारच्या विविध कामगार विरोधी तरतुदींमुळे कामगार क्षेत्र संपुष्ठात येईल. बेरोजगारी वाढेल जर बेरोजगारी वाढली हातात पैसे राहिलेच नाही तर कंपनीचा माल घेण्यास गिऱ्हाईक राहणार नाही त्यामुळे उद्योग व्यवसाय संपुष्ठात येऊन श्रीलंकेप्रमाणे अराजकता माजू शकते.
यावेळी बोलताना भोसले म्हणाले कि, कोरोनाचा फायदा घेत अनेक कामगारांना देशोधडीला लावण्याच्या घटना घडल्या आहेत, शेकडो कामगार कामावरून कमी करण्यात आले, सध्या ऑनलाईनच्या काळामध्ये नागरिकांना ऑनलाईन खरेदीची सवय लावण्यात येत असल्याने लहान लहान उद्योग बंद पडू लागले परंतु काही वर्षांनी हेच ऑनलाईन विक्रीतील वस्तू महाग करण्याचा यांचा प्रयत्न आहे, सध्याचे सरकार कामगारांच्या हिताचे नसून उद्योगपतींच्या हिताचे आहेत, कामगारांच्या मतावर सरकार निर्माण होत असते मात्र कामगारांना वाऱ्यावर सोडण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याचे देखील यशवंत भोसले यांनी सांगितले.
