- बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली माहिती
महाराष्ट्रातील राज्य सरकारी सेवेत नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त झालेल्या सरकारी - निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करुन फार मोठा अन्याय केला आहे. या याजनेतील ६० टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवण्यात येत असुन शेअर्सच्या दराच्या चढ- उतारावर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे.हा एक जुगारच असुन सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्याचा सरकार जुगार खेळत आहे आणि त्यासाठी सर्वांना जुनी पेन्शन मिळावी या एकाच मागणीसाठी राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन दिनांक २१ सप्टेंबर रोजी करण्यात आल्याचे बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने केलेल्या दिनांक ७,८,९ ऑगस्ट २०१८ तीन दिवसीय राज्यव्यापी संपाच्या दबावाने शासनाने अर्थ राज्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली पेन्शन प्रश्नी समिती स्थापन केली. या समितीने साडेतीन वर्षांत फक्त तीन बैठका घेतल्या.परंतु कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. शासनाच्या या चालढकलीने राज्यातील १७ लक्ष सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. यास्तव पुन्हा दिनांक २३ व २४ फेब्रुवारी २०२२ असा दोन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला. या पार्श्वभूमीवर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी संघटनेसमवेत बैठक घेऊन पेन्शन योजने संदर्भात फेरविचार करण्याचे आश्वासीत केले. या घटनेला सुद्धा सहा महिने उलटून गेले आहेत.
नेमक्या याच कालावधीत राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड या राज्य सरकारांनी अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन त्याऐवजी पहिलीच जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. इतर काही राज्यातील सरकारे सुद्धा तसाच निर्णय घेण्याच्यि हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यात मात्र असा निर्णय घेण्याची तयारी अद्याप दिसत नसल्याने कर्मचारी संतप्त झाल्याचे अविनाश दौंड यांनी सांगितले आहे.
सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी दिनांक २१ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत राणी बाग मैदान,भायखळा ते आझाद मैदान अशी रॅली काढण्यात येणार असून या बाईक रॅलीत हजारो कर्मचारी सामिल होणार असल्याची माहिती अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख आणि सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली आहे.
या बाईक रॅलीची सांगता आझाद मैदानावरच्या भव्य जाहीर सभेने होणार असुन सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा नजीकच्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अविनाश दौंड यांनी दिला आहे.