ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहनमालक यांचा कारखानदार आणि सरकारविरोधात एल्गार

आज दि.20 सप्टेंबर रोजी पुणे साखर आयुक्त कार्यालयासमोर काढणार मोर्चा

साखर कारखानदार आणि सरकार या दोघांचा मिळून हे कल्याणकारी मंडळ बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप करीत ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहनमालक यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंगळवारी दि.20 सप्टेंबर रोजी राज्यभरातून भव्य मोर्चा पुण्यात धडकणार असल्याची माहिती महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय कामगारनेते डॉ. डी. एल. कराड यांनी दिला आहे असे वृत्त Qoxag न्यूज मॅगझिनने दिले आहे.

महाविकास आघाडी सरकारने ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहनमालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले, त्यासाठी कार्यालयाचे उद्घाटनही झाले. मात्र, प्रतिनिधी स्वरूपात दहा कामगारांना ओळखपत्रही दिले, तरीही त्या मंडळाचे कामकाज अद्यापही सुरू झालेले नाही.

    महामंडळ बंद पाडण्याचा डाव सुरू आहे, त्यामुळे या क्षेत्रातील कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणकारी मंडळाचे कामकाज तातडीने सुरू करावे; ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहनमालकांना(vehicle owners) ओळखपत्र द्यावीत; मुकादम व वाहनमालकांची थकित बिले त्वरित अदा करावित; विमा योजना घरासाठी अनुदान; पाल्यांसाठी शिष्यवृत्ती तसेच अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने 20 सप्टेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालय, पुणे येथे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

    महाविकास आघाडी सरकारने जरी महामंडळ स्थापन करून कार्यालय सुरू केले असले, तरीसुद्धा झालेल्या निर्णयानुसार साखरेच्या उत्पादनाच्या प्रत्येक टनामागे 10 दहा रुपये याप्रमाणे साखर कारखान्यांनी निधी द्यायचा आहे. तसेच, तेवढाच निधी राज्य सरकारने द्यायचा आहे, याबाबतही साखर कारखान्यांनी एक रुपयाही अद्याप दिलेला नाही. यासोबतच ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहनमालकांना कुठल्याही योजना किंवा लाभ लागू केलेले नाहीत. साखर कारखानदार व सरकार या दोघांचा मिळून हे कल्याणकारी मंडळ बंद पाडण्याचा डाव दिसून येत आहे. मोर्चाच्या तयारीसाठी 24 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये भव्य परिषद घेण्यात आली. तसेच राज्यात ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहनमालकांच्या राज्यभरात मोर्चाची तय्यारी सुरु होती, त्यामुळे या मोर्चाला हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुभाष जाधव, उपाध्यक्ष आबासाहेब चौगुले आणि दत्ता डाके यांनी दिली.

     ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहनमालकांच्या मतावर अनेक नेते निवडून येतात. सत्तेमध्ये जातात, मंत्री होतात, परंतु ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहनमालकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. यामुळे या क्षेत्रातील कामगारांमध्ये तीव्र संतोष आहे. मुख्यमंत्र्यांनी ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहनमालकांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे खजिनदार हिरामण तेलोरे यांनी केली आहे.