मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी चळवळीचे जनक स्व र.ग.कर्णिक यांनी महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची संघटना सन १९६२ मध्ये स्थापन केली.या राज्यव्यापी संघटनेने सर्वप्रथम दिनांक ११ ऑगस्ट १९६२ रोजी सामुदायिक रजा आंदोलन करुन संप लढ्याची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हा पासून प्रतिवर्षी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना राज्यातील सर्व जिल्ह्यात ११ ऑगस्ट हा चेतना दिन म्हणून पाळते.या वर्षी मंत्रालयासह बृहन्मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयात आणि इतर जिल्ह्यांच्या मुख्यालयात कर्मचाऱ्यांनी आदरणीय कर्णिक यांच्या प्रतिमे समोर देशसेवेची प्रतिज्ञा घेतली.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई येथे कामगार - कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी मध्यवर्ती संघटनेचे सचिव अविनाश दौंड यांनी शासकीय मुद्रणालयातील कामगारांच्या प्रश्नांचा आढावा घेऊन कामगारांच्या प्रश्नांची लवकरात लवकर तड लागावी तसेच राज्यातील सर्व नवीन अंशदायी पेन्शन धारकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, बक्षी समितीचा दुसरा खंड लवकर प्रकाशित करावा अशी जाहिर मागणी करत,जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यव्यापी मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला दिला.
याप्रसंगी कामगार संघटनेचे विजय चव्हाण, सुनील रासम, लिपिक संघटनेचे संतोष डोके, बाळकृष्ण तुरुंबाडकर, संचालनालय कर्मचारी संघटनेचे नागेश कोळेकर आणि दिगंबर पालांडे यांचे सह मोठ्या संख्येने कामगार- कर्मचारी उपस्थित होते. या निदर्शनांना कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.