कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय समरगीत स्पर्धेत नागपूरची बाजी

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्राने मोलाची भूमिका बजावली आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजगुरु याच मराठी मातीने दिले आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे माझी मैना हे गीत आंदोलन म्हणून उभे राहिले होते. शाहीर पठ्ठे बापूराव, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर साबळे यांनी शाहिरीच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. त्यामुळे महाराष्ट्राचे समरगीत दिल्लीच्या लाल किल्ल्यावर गायले गेले पाहिजे, अशा भावना  सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी व्यक्त केल्या.

   महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे ९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त कामगार कल्याण भवन, कन्नमवार नगर, विक्रोळी येथे आयोजित राज्यस्तरीय समरगीत / स्फूर्तिगीत स्पर्धेत ते बोलत होते. कल्याण आयुक्त रविराज इळवे, प्र.उपकल्याण आयुक्त महेंद्र तायडे, स्पर्धेचे परीक्षक मधूकर खामकर, प्रतिभा वाघमारे, मंगेश चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.धनंजय येडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

    ललित कला भवन, विनोबाग्राम, नागपूर या संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक कामगार कल्याण भवन, कोतवालपूरा, औरंगाबाद संघाला, तर तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र, अमरावती संघाला जाहीर करण्यात आला आहे. उत्तेजनार्थ बक्षीस कामगार कल्याण केंद्र, बल्लारपूर, चंद्रपूर आणि कामगार कल्याण केंद्र, सागरमाळ, कोल्हापूर यांना जाहीर करण्यात आले आहेत. मंडळाच्या १९ गट कार्यालय स्तरावर प्राथमिक फेरीत उत्तीर्ण झालेल्या १९ संघांचा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग होता. आभार सहायक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे यांनी मानले.