भारतीय मजदूर संघाचा यशवंत भोसले यांच्या उपोषणाला व मागण्यांना जाहीर पाठिंबा : चंद्रकांत (अण्णा) धुमाळ

पुणे : केंद्र सरकारच्या कामगार कायद्याच्या नवीन धोरणा विरोधात तसेच कोरोना कालावधीमध्ये नोकऱ्या वरून काढलेल्या कामगारांना कामावर परत घ्यावे याकरिता कामगार नेते राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांचे अप्पर कामगार आयुक्त कार्यालय, शिवाजीनगर पुणे येथे प्राणांतिक उपोषण चालू असून त्या उपोषणाच्या ठिकाणी (दि.१२ ऑगस्ट) भारतीय मजदूर संघाचे नेते श्री चंद्रकांत उर्फ अण्णा धुमाळ यांनी आंदोलनास तसेच सर्व मागण्यांना पाठिंबा दिला

     यावेळी चंद्रकांत (अण्णा) धुमाळ हे आपल्या भाषणात म्हणाले, केंद्राने बदललेल्या कामगार कायद्यातील धोरणांच्या ज्या मुद्द्यावर यशवंत भाऊ भोसले यांनी विरोध दर्शविला आहे, त्याच मुद्द्यांना भारतीय मजदूर संघाचा विरोध आहे. Fix Term Employment यामुळे परमनंट कामगार पद्धत संपुष्टात येणार आहे. कारखाना बंद करण्यासाठी व कामगार कपात करण्याकरिता यापुढे भविष्यात ३०० कामगार ज्या कारखान्यात आहेत त्या कारखानदारांना तो कारखाना बंद करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागणार नाही, त्यामुळे कारखान्यातील कामगार कपात करणे किंवा कारखाना बंद करणे याबाबतचा निर्णय कंपनी मालक कधीही घेऊ शकतो.

    कामगार संघटनेमध्ये नवीन धोरणाविषयी भविष्यात फूट पडण्याचे शक्यता आहे. या नवीन कायद्याच्या मुद्द्याबाबत यशवंत भाऊ भोसले यांनी घेतलेले आक्षेप रस्ता असून त्यांच्या या उपोषणामुळे, नवीन कामगार कायद्यामुळे राज्यातील कामगारांना भविष्यात जो धोका निर्माण झालेला आहे त्याची माहिती व कामगार जागृती होण्यास मदत होत आहे. देशातील करोडो कामगारांसाठी व येणाऱ्या तरुण युवकांच्या हिताकरिता यशवंत भाऊ भोसले यांनी घेतलेल्या प्राणांतिक उपोषणाच्या धाडसी निर्णयाचे आम्ही कौतुक करतो आणि भाऊंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तब्येती करता हे उपोषण सोडावे. 

     यावेळी बोलताना चंद्रकांत (अण्णा) धुमाळ म्हणाले की, या उपोषणाची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याची त्वरित दखल घ्यावी.

   त्यानंतर यशवंतभाऊ भोसले म्हणाले की,  भारतीय मजदूर संघाने महाराष्ट्र राज्यात हा कायदा लागू करू नये याकरिता राज्य सरकारवर दबाव आणावा. जोपर्यंत राज्य शासन यावर कोणता ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही प्राणांतिक उपोषण चालूच ठेवणार असल्याचा निर्धार भोसले यांनी बोलून दाखविला.

      महाराष्ट्र राज्यातील तमाम कामगारांनी व कामगार संघटनांनी भविष्याचा धोका ओळखून यशवंत भाऊ भोसले यांच्या उपोषण आंदोलनामध्ये त्वरित सहभाग नोंदवावा व कामगार कायद्याच्या धोरणास आपला आक्षेप नोंदवून प्रखर विरोध करावा असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे चंद्रकांत (अण्णा) धुमाळ यांनी व यशवंतभाऊ भोसले यांनी यावेळी केले.