भोसरीतील बहुराष्ट्रीय कंपनीला लागले टाळे

पिंपरी : कोरोना कालावधीनंतर आलेल्या आर्थिक संकटामुळे भोसरी एमआयडीसीतील ब्लॉक एफ दोन मधील बहुराष्ट्रीय एक्सएएल टूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (XAL Tool India Pvt Ltd) कंपनीला टाळे ठोकण्यात आले आहे.हा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी रविवारी (ता. २४) घेतला. कंपनीने सर्व कायदेशीर देणी दिली आहेत. परंतु, कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

    ''कंपनीतील ८४ कर्मचारी व कामगारांना थेट मेलद्वारे कळविण्यात आले आहे. कंपनी व संघटनेतील करार संपण्याअगोदरच कंपनीने कामगारांना बडतर्फ केले आहे. व्यवस्थापकीय अधिकारी देश सोडून गेले आहेत. कंपनी बंद करत असल्याची पूर्वसूचना कोणतीही दिलेली नाही. अन्यथा, आम्ही दुसरीकडे कामाचा प्रयत्न केला असता. सध्या दुसऱ्या कंपनीत कामाची विचारणा केली असता, आमच्याबाबत गैरसमज केला जात आहे. सरसकट सर्वांना कामावरून काढले आहे. कंपनीने कर चुकवेगिरी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आधीची जुनी कंपनी एका नव्याने असताना दुसऱ्या नावाने कंपनी स्थापन करण्यात आली होती. कंपनीतील यंत्रसामुग्रीची विक्री करून नव्याने प्लांट उभारला जाणार आहे,'' अशी माहिती एक कामगार प्रशांत परांजपे यांनी 'सकाळ'ला दिली आहे.

    कामगारांमध्ये दहशत पसरविण्यासाठी कंपनीने यापूर्वी अनेकदा परस्पर बाउंसर्स नेमून गेटवरुनच कामगारांना हाकलून दिले आहे. कामगार संघटनेचे ५४ सभासद आहेत. कंत्राटी धरुन शंभरपेक्षा जास्त कामगार कामावर आहेत. २३ जुलैपर्यंत कंपनीचे कामकाज सुरळीत सुरु होते. २४ जुलैला अचानक सर्वांच्या बॅंक खात्यात पगार, पीएफ, इएसआय, तसेच करांसहित गॅज्युएटी, बोनस जमा झाला. कंपनीचे क्लोजर हे बेकायदेशीररीत्या झालेले आहे. कामगारांना न्याय मिळून नुकसान भरपाईचे आदेश काढावेत. यंत्रसामग्री देशाबाहेर नेण्याची मनाई करावी. यासाठी न्यायालयात दाद मागणार आहोत.
- संतोष बेंद्रे अध्यक्ष, शिवगर्जना कामगार संघटना

    एक्सएएल टूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला मोठ्या खेदाने आम्हाला जाहीर करावे लागत आहे की, कंपनीच्या अस्थिर आर्थिक परिस्थितीमुळे, २४ जुलैला कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे लागले. कामगारांना सर्व अर्थविषयक कायदेशीर देणी दिली आहेत. निर्णय घेताना आम्ही कायद्याचे पूर्ण पालन केले आहे. रोजगार चालू ठेवण्याचा हेतू नेहमीच होता. व्यवस्थापनाने त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये गंभीर नुकसान झाले आणि यापुढे व्यावहारिक आर्थिक परिस्थितीमुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
- अलेस्सांद्रो लॅम्ब्रुची, व्यवस्थापकीय संचालक, एक्सएएल टूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, भोसरी