अविनाश दौंड यांची कामगार संघटनेच्या सल्लागार पदी निवड

राज्य सरकारी कर्मचारी चळवळीतील अग्रगण्य संघटना शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटनेच्या सल्लागार पदी ज्येष्ठ कामगार नेते अविनाश दौंड यांची निवड करण्यात आली आहे.

    शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटनेची स्थापना सन १९३० साली झाली असून सन १९३२ साली संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केल्याचा उल्लेख कामगार आयुक्त कार्यालयात नोंदित आहे. संघटनेचे कार्य नऊ दशके अव्याहतपणे सुरू असुन संघटनेने ९२ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

    कामगार नेते र.ग. कर्णिक यांनी स्थापन केलेल्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी उपक्रमात संघटनेचे योगदान फार मोठे आहे. यातुनच राज्यातील लक्षावधी सरकारी- निमसरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांसमान वेतन,भत्ते आणि सोयी सुविधा मिळाल्या आहेत.

    संघटना सातत्याने रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, पुरग्रस्त आणि दुष्काळग्रस्तांना आर्थिक तसेच वस्तूरुपी मदत असे समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. मध्यवर्ती संघटनेच्या नागरी सेवा प्रबोधिनी आणि भगिरथ प्रकल्प या दोन्ही न्यासांमार्फत होणाऱ्या आदिवासी विकास,  एड्स नियंत्रण कार्य,  शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रबोधन या कार्यात संघटना नेहमीच अग्रेसर राहिली आहे.

    संघटना आपल्या सभासदांसाठी राबवित असलेल्या कल्याणकारी उपक्रमांची नोंद तर भारतीयच नव्हे तर जागतिक कामगार चळवळीच्या अभ्यासकांनी घेऊन तसा गौरव ग्रंथांत केला आहे ही बाब ऐतिहासिक आहे. 

    अशा या अग्रगण्य आणि ऐतिहासिक संघटनेच्या सल्लागार पदी आजवर सुप्रसिद्ध कामगार नेते दिनकर देसाई,बिडेश कुलकर्णी,जी. एस. गुप्ते, पुरुषोत्तमदास ठक्कर, व्ही. व्ही. रानडे, नानासाहेब कुंटे, दादासाहेब परुळेकर, शामराव सामंत, राम महाडिक, र.ग. कर्णिक, भाई आचरेकर, दादा मंडलिक यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले आहे. ज्येष्ठ नेते कर्णिक साहेबांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे सन २०२१ पर्यंत सातत्याने ३२ वर्षे या संघटनेला सल्लागार म्हणून मार्गदर्शन केले आहे. आता हा बहुमान गेली ३५ वर्षे राज्य सरकारी कर्मचारी चळवळीत कार्यरत अविनाश दौंड यांना प्राप्त झाल्याने मुद्रणालयीन कामगारांमध्ये तसेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

    मुद्रणालयीन कामगारांच्या पदांचा आढावा लवकरात लवकर होणे, गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले केंद्रासमान नवीन प्रवेश नियम तात्काळ लागू करावेत तसेच रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत यासाठी आता संघटना शासन दरबारी जोरदारपणे प्रयत्न करील असे अविनाश दौंड यांनी सांगितले आहे.