टाटा मोटर्सने खरेदी केला फोर्ड मोटर्सचा कारखाना, सर्व कामगार टाटा मोटर्स मध्ये होणार सामील

गुजरात :  साणंद येथील फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा कारखाना टाटा मोटर्सने विकत घेतला आहे. फोर्ड कंपनीने विक्री मंदावल्यामुळे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फटका भारतीय ग्राहकांसह ऑटोमोबाईल क्षेत्रालाही बसला. त्यामुळे ही कंपनी अधिग्रहण करण्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. मात्र, आता मोटार कार उत्पादनातील आघाडीची कंपनी टाटा मोटर्स कंपनीने फोर्ड कंपनीचा गुजरातमधील प्रकल्प खरेदी केला आहे. यासंदर्भात टाटा मोटर्स, फोर्ड इंडिया आणि गुजरात सरकार यांच्यात त्रिपक्षीय करार झाला असल्याची माहिती आहे.

     या सामंजस्य करारांतर्गत टाटा मोटर्सने फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा गुजरातमधील साणंद मॅन्युफॅक्चरिंग कारखाना विकत घेतला आहे. या कराराअंतर्गत साणंद येथील फोर्ड कंपनीची जमीन, कारखाना, वाहन निर्मितीचे यंत्रसामग्री टाटा मोटर्सकडे येणार आहे. यासंदर्भात टाटा मोटर्सने शेअर बाजारांना माहिती कळवली आहे. फोर्ड कारखान्यातील सर्व कामगार आता टाटा मोटर्समध्ये सामील होणार आहेत. या कारखान्यातून टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार असल्याचे टाटा मोटर्स कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

     या अधिग्रहणानंतर सामंजस्य करारानुसार, या कारखान्याद्वारे दरवर्षी ३ लाख युनिट्सचे उत्पादन केले जाईल, जे आणखी वाढवून दरवर्षी ४ लाखांपर्यंत वाढवता येईल. टाटा मोटर्सने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, हा सामंजस्य करार सर्व भागधारकांसाठी चांगली बातमी देणारा आहे आणि याच्या मदतीने टाटा मोटर्स प्रवासी वाहन आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षमता आणखी वाढवू शकणार आहे.