पिंपरी : श्रमिक एकता महासंघाच्या वतीने रविवार दि. १ मे रोजी पिंपरी-चिंचवड शहरात भव्य आशा कामगार रॅलीचे आणि कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. बजाज ऑटो एम्प्लॉईज को-ऑप. सोसायटी, यमुनानगर निगडी, येथून दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. अनेक बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यामधील कामगारांनी उस्फुर्त पणे मोठयासंखेने यामध्ये सहभाग घेतला.
कामगार आंदोलनाच्या वेळी गोळीबारात शहीद झालेले कामगार कॉम्रेड दत्ता पाडळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही कामगारांची दुचाकी रॅली, खंडोबा मंदिर आकुर्डी ते थरमॅक्स चौक, कस्तुरी मार्केट, संभाजी नगर, शाहू नगर, घरकुल चिखली, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी या मार्गे नाशिक रोडने साधुराम गार्डन मंगल कार्यालय, गंधर्व नगरी, मोशी येथे अली. रॅली दरम्यान महासंघाच्या स्वयंसेवक कामगार बांधवांनी अतिशय शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक व्यवस्था करत, वाहतुकीला अडथळा येणार नाही अशा पद्धतीने रॅलीचे संचालन केले.
रॅलीचे साधुराम गार्डन मंगल कार्यालय येथे भव्य आशा कामगार मेळाव्यात रूपांतर झाले. साधारण 1000 ते 1100 कामगार बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत हा कामगार मेळावा झाला. शिरूर, रांजणगाव,नगर रोड ते जेजुरी, सातारा, शिरवळ पासून खोपोली, तळेगाव ,चाकण, पिंपरी-चिंचवड, पुणे आणि औरंगाबाद, जळगाव इत्यादी ठिकाणाहून कामगार बांधव मेळाव्यासाठी उपस्थित होते. कामगार मेळाव्यासाठी कामगार नेते सुदर्शन राव साहेब हे हैद्राबाद येथून तर इंडस्ट्री ऑल चे मा.प्रवीण राव साहेब हे मुंबई येथून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच "कामगारनामा" चे भूषण कडेकर आणि डॉ. प्रीतिताई व्हिक्टर या विशेष सन्मानार्थी म्हणून उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज व रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, "चांगल्या कामासाठी भरपूर शक्ती दे दाता" अशी विश्वप्रार्थना करत कामगार मेळाव्याची सुरूवात झाली. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार होते. जनरल सेक्रेटरी मनोज पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महासंघाचा थोडक्यात अहवाल सांगितला. इंडस्ट्री ऑल ग्लोबल युनियन चे प्रवीण राव साहेब यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील संघटनांना इंडस्ट्री ऑल ग्लोबल युनियन च्या माध्यमातून मदत मिळण्याबरोबरच प्रतिनिधींचे प्रशिक्षण आणि मिटिंग च्या माध्यमातून एकमेकांचे प्रश्न सोडवायला मदत होते त्याबाबत इंडस्ट्री ऑल ची माहिती दिली. कामगार नेते सुदर्शन राव साहेबांनी येणाऱ्या काळात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले तरीसुद्धा आपण आपल्या हक्कासाठी रोजगारासाठी लढू शकतो, लढा उभारवाच लागेल तरच आपण उभे राहु असे सांगितले. त्याच बरोबर आपल्या सर्वाना पृथ्वीवरच राहायचे आहे.आपण चंद्रावर नाही जाऊ शकत. त्यामुळे पर्यावरण वाचवणे सुद्धा गरजेचे असल्याचे सांगितले.
कामगारनामाचे भूषण कडेकर आणि कोविड काळामध्ये ज्यांचे विशेष सहकार्य लाभले आशा डॉ.प्रीतिताई व्हिक्टर यांचा विशेष सन्मान या कामगार मेळाव्यात करण्यात आला. कामगारांसाठी व कामगार चळवळीसाठी स्वतंत्र वृत्तविहिनी (ऑनलाइन न्युज पोर्टल) *कामगारनामा* च्या माध्यमातून कामगारांना आवश्यक माहिती, वेतनवाढीचे करार, तज्ञांचे मार्गदर्शन आणि विविध योजनांची माहिती सर्व कामगार व प्रतिनिधी यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल कामगारनामा न्यूज पोर्टल चे मुख्य समन्वयक भूषण कडेकर यांचा विशेष सत्कार व गौरव करण्यात आला. कामगार प्रतिनिधी व व्यवस्थापन प्रतिनिधी यांनी समन्वयाने काम केल्यास गुंतागुंतीचे अनेक प्रश्न तयारच होणार नाहीत. त्यामुळे एकोप्याने काम कारणे गरजेचे असल्याचे सांगितले. कामगारांच्या गरजेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवावी हा उद्देश कामगारनामा चा असून आत्तापर्यंत 90 वेतनकारार कामगारनामा वर उपलब्ध असल्याचे सांगितले. डॉ.प्रीतिताई व्हिक्टर यांनी पिंपरी-चिंचवड कारांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि ती प्रामाणिकपणे पार पडल्याचे नमूद करून श्रमिक एकता महासंघाचे आभार व्यक्त केले.
कामगार नेते व महासंघाचे सल्लागार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, केशव घोळवे यांनी पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या बाबत केलेल्या विशेष कामाची माहिती दिली. त्यांचे वेतनवाढ व इतर सामाजिक सुरक्षे बाबत केलेल्या कामाचा उल्लेख करून इतरत्र ही असे मोठे काम होऊ शकते असे सांगितले. महासंघाचे सल्लागार अरविंद श्रौती यांनी कामगारांनी स्वतः वेगवेगळे व गरजेची नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले.
जेष्ठ कामगार नेते आणि महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे यांनी कायदे बदल व इतर गोष्टींचे करण पुढे करून कामगारांना घाबरवण्याचे प्रकार काही व्यवसायिक संघटना व व्यवस्थापणा कडून झाले तरी कामगारांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले.आहे या कायद्यांचा वापर करून आपण आपली लढाई लढू व हक्क आणि न्याय मिळवू असा विश्वास कामगारांना दिला.त्यांनी दिलेल्या भक्कम अधारामुळे कामगारांच्या मध्ये चैतन्य भरले व टाळ्यांच्या गजरात कामगारांनी त्यांना दाद दिली. महासंघाचे अध्यक्ष आणि आजच्या मेळाव्याचे अध्यक्ष लढाऊ जेष्ठ कामगार नेते दिलीप पवार यांनी अध्यक्षीय भाषणांमध्ये कामगारांनी एकत्र येण्याबरोबरच वेगवेगळ्या लढ्याची माहिती घेतली पाहिजे.स्वतःचे कौशल्य व नेतृत्वगुण वाढवले पाहिजे. विविध प्रशिक्षण घेऊन समर्थ पणे सकारात्मकते आलेल्या प्रसंगाला सामोरे जाऊन काम केले पाहिजे. तसेच प्रसंगी लढायची तयारीही ठेवली पाहीजे. असे सांगून कामगारांना मार्गदर्शन केले.
महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष कणसे यांनी आभार प्रदर्शन केले. विकास कर्पे यांनी अतिशय चांगले सूत्रसंचालन करून सर्व कार्यक्रम सुरळीत पणे उत्साहात संपन्न केला. शेवटी राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली. या साठी महासंघाचे खजिनदार मा. रोहित पवार, दत्तू झेंडे, तात्या भोसले, महेश खानापूरकर ,महेंद्र पासलकर, मिलिंद बायस्कर, पंकज पाटील तसेच बजाज विश्वकल्याण च्या टीम ने विशेष परिश्रम घेतले.