राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने कामगारदिनी भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन

सणसवाडी,पुणे : दि.१ मे २०२२ जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन याचे औचित्य साधत राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने सणसवाडी, ता.शिरुर येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगार मेळाव्याला राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी उपस्थित राहून कामगारांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शिरुर हवेलीचे आमदार अ‍ॅड.अशोकबापू पवार,जुन्नरचे आमदार अतुल बेनके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप,राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघांचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर ढोकले, पंचायत समितीचे मा.सभापती विश्वासआबा कोहकडे, पुणे जिल्हा विकास मंचचे अध्यक्ष सदाशिव अण्णा पवार, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, सणसवाडीच्या सरपंच संगिताताई हरगुडे, मा.सरपंच स्नेहलताताई भुजबळ, रूपालीताई दरेकर, उपसरपंच सागर भाई दरेकर एड विजयराज दरेकर राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय येळवंडे, उपाध्यक्ष राजू अण्णा दरेकर, रमेश सातपुते, खजिनदार गणेश जाधव, राजाराम शिंदे यांसह विविध १५२ कामगार संघटना मधील पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात कामगार उपस्थित होते

   यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांना 'उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार', कामगार नेते अविनाश वाडेकर यांना 'कै.रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार भूषण पुरस्कार', ग्रुप अँटो व जॉन डिअर च्या संघटना व मॅनेजमेंटला 'औदयोगिक समन्वय पुरस्कार', कामगार नामाचे भूषण कडेकर यांना 'कै.भाई वैद्य स्मृती पुरस्कार २०२२' देऊन सन्मानित करण्यात आले.

    मेळाव्यामध्ये मार्दर्शन करताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले कि, मी वर्षभर राज्याचा कामगार मंत्री होतो. केंद्राने जेव्हा लेबर कोड आणून तो कायदा लागू झाला. त्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या अनुषंगाने नियम बनविण्याचे काम आम्हाला करायचे होते. ते बनवत असताना कामगारांना जास्तीत जास्त झुकते माप कसे देता येईल, असा माझा प्रयत्न होता. राष्ट्रीय श्रमिक एकता संघाच्या पदाधिकाऱ्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी त्यांच्या कामगारांच्या प्रश्नांचे निवेदन तयार करावे. ते घेऊन आपण कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊ. जे राज्याचे प्रश्न असतील त्याबाबतीत आदरणीय पवार साहेबांची भेट घेऊ.

   आमदार अशोक पवार म्हणाले कि, उद्योग राज्यात येत असताना ज्यांच्या जमिनी गेल्या अशा स्थानिक लोकांना रोजगार मिळणे देखील आवश्यक आहे. याकरिता स्थानिक लोकांना रोजगार या व्याख्येमध्ये संबंधित भागातील लोकांना प्राधान्य कसे देता येत हे पाहणे महत्वाचे आहे.

    राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर ढोकले यांनी महासंघाचा आढावा घेताना कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्या मधील स्नेहसंबंध याविषयी भाष्य केले तसेच कामगार संघटनांनी चाकोरी मोडून इतर कामगार विषयक व सामाजिक विषयात देखील पुढाकार घेतला पाहिजे असे सांगितले.