कोळसा खाणीत काम करणार्या कंपन्यांकडून Hilltop Company स्थानिक युवकांना डावलून परप्रांतातील कामगारांचा भरणा केला जात आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांवर होत असलेले अन्याय खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा वणी नॉर्थ एरीया अंतर्गत कोलार पिंपरी कोलमाईन्समध्ये काम करणार्या हिल्टॉप कंपनीमध्ये 19 फेब्रुवारी रोजी केलेल्या धरणे आंदोलनात भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी नप अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिला असे वृत्त तरुण भारत नागपूर वृत्तसंस्थेने दिले आहे.
कोलार पिंपरी माईन्समध्ये हिल्टॉप कंपनी ओव्हरबर्डन व कोळसा उत्खननचे काम करते. या कंपनीमध्ये जवळपास 400 ते 450 कामगार कार्यरत आहे. उद्योग प्रकल्पामध्ये नोकरीसाठी स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याचा कायदा असताना कंपनीमध्ये फक्त 115 स्थानिक लोकांना कामावर घेण्यात आले आहे. नियमानुसार जवळपास 350 स्थानिक कर्मचार्यांचा समावेश करणे अपेक्षित आहे. परंतु कंपनीने निम्याहून जास्त परराज्यातील कामगारांना कामावर ठेवले आहे. त्यामुळे स्थानिक युवकांवर अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कंपनीच्या मुख्य गेटसमोर स्थानिक युवकांसह धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनामध्ये भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष व माजी नप अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, कोलार पिंपरी ग्रापं सरपंच साधना बंडू उइके, निळापूर सरपंच पुजा बोढाले, गोवारीचे उपसरपंच रवींद्र आस्कर, अनिल बोढाले, ब्राम्हणी, निळापूर, गोवारी, कोलार पिंपरी, कोना, अहेरी या गावातील अनेक युवकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. मागण्या पूर्ण न झाल्यास मंगळवार, 22 फेब्रुवारी पासुन कामबंद आंदोलन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. कामबंद आंदोलनात संबंधित गावातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.