पुणे : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे २०२१-२२ या वर्षासाठी गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध खासगी व निमसरकारी आस्थापनांतील, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व संघटन क्षेत्रांत कार्यरत कामगारांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावा, असे आवाहन पुणे विभागाचे सहायक आयुक्त समाधान भोसले यांनी केले आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
कामगार कल्याण मंडळाकडे दरवर्षी कल्याण निधी भरणारी खासगी दुकाने, कारखाने, वर्कशॉप, कंपनी, हॉटेल, उपाहारगृहे व बँकांमध्ये किमान पाच वर्षांपासून काम करणारे कामगार, हे गुणवंत कामगार व कामगार भूषण पुरस्कारासाठी पात्र आहेत. संबंधित व्यक्ती पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात.
राज्यात दरवर्षी ५१ कामगारांना गुणवंत कामगार पुरस्काराने गौरवण्यात येते. २५ हजार रुपये स्मृतिचिन्ह व मानपत्र असे गुणवंत कामगार पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच गुणवंत कामगार पुरस्कार मिळून १० वर्षे झाल्यानंतर, संबंधित व्यक्ती कामगार भूषण पुरस्कारासाठी अर्ज करू शकते. कामगार भूषण पुरस्कारासाठी ५० हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र दिले जाते, अशी माहिती कल्याण आयुक्त रविराज डळवे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
राज्य कामगार कल्याण मंडळाच्या www.publicmiwb.in या संकेतस्थळावर, तसेच कामगार कल्याण मंडळाच्या राज्यातील विविध केंदांत पुरस्कारासाठीचे अर्ज मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आवश्यक कागदपत्रांसह पुरस्काराचा प्रस्ताव येत्या २८ फेब्रुवारीपूर्वी कल्याण मंडळाच्या मुंबई कार्यालयाच्या पत्त्यावर पाठविण्यात यावा, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.