अलिबाग : अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथील निटको टाइल्स कंपनीला व्यवस्थापनाने दोन वर्षांपूर्वी टाळे ठोकले आहे. त्यामुळे ३०० हून अधिक कामगारांवर बेकारीची कुरहाड कोसळली . परंतु अद्याप या कामगारांना व्यवस्थापनाने कोणताही मोबदला दिलेला नाही. कंपनी व्यवस्थापनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने आज कामगारांनी बंद पडलेल्या कंपनीच्या प्रवेशव्दारावर एकत्र येवून व्यवस्थापनाचा निषेध नोंदवला असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.
दोन वर्षांपूर्वी २७ जानेवारी रोजी निटको व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीला अचानक टाळे ठोकले. यामुळे कंपनीत काम करणारे ३०० हून अधिक कामगार रस्त्यावर आले. पर्यायाी कुठलीही व्यवस्था न करता कामगारांना उघडयावर टाकून कंपनीने गाशा गुंडाळला. यामुळे इथं काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. कोरोनामुळे रोजगाराची संधीही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांचे गुजराण करणे अवघड होवून बसले आहे.
सध्या हे प्रकरण कामगार न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु कंपनी व्यवस्थापनाकडून याला कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. असे असले तरी निटको व्यवस्थापनाविरोधातील लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार या कामगारांनी केला आहे. गुरूवारी टाळेबंदीची व्दिवर्षपूर्ती निमित्त सर्व कामगार कंपनीच्या प्रवेशव्दारावर एकत्र आले. यावेळी व्यवस्थापनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.