राष्ट्रीय स्तरावरील 'इंडिया स्किल्स २०२२' स्पर्धेसाठी क्रेडाई पुणे मेट्रो - कुशल तर्फे कामगारांचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) अंतर्गत येत्या ६ ते १० जानेवारी दरम्यान दिल्ली येथे होणा-या 'इंडिया स्कील्स २०२२' स्पर्धेत सहभागी १२ तरुण बांधकाम कामगार स्पर्धकांचे कौशल्य प्रशिक्षण क्रेडाई- पुणे मेट्रोच्या कुशल उपक्रमांतर्गत नुकतेच पूर्ण झाले असे वृत्त महाराष्ट्र लोकमंच वृत्तसंस्थेने दिले आहे.

    विविध राज्यातील हे स्पर्धक आता दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय स्तरावरील 'इंडिया स्कील्स २०२२' स्पर्धेसाठी सज्ज झाले असून या स्पर्धेतील विजेते चीन येथे होणा-या 'जागतिक स्कील्स २०२२' स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने या स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

    महाराष्ट्रासोबतच केरळ, ओडीसा, बिहार, मध्यप्रदेश आणि तेलंगणा राज्यातील एकूण १२ स्थानिक बांधकाम कामगारांचा या प्रशिक्षणामध्ये समावेश होता. पुण्यातील एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी २२ डिसेंबर, २०२१ ते ४ जानेवारी २०२२ दरम्यान कुशल क्रेडाईच्या वतीने या बांधकाम कामगारांना ब्रिकलेइंग आणि वॉल फ्लोर टाईलिंगचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

    प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या कामगारांचे मनोधैर्य वाढावे, या उद्देशाने या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष व अमर बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमर मांजरेकर, महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास अधिकारी संध्या चौधरी यांच्या उपस्थितीत कामगारांना प्रशस्तीपत्रके देत सन्मानित करण्यात आले.

    कुशल क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष जे पी श्रॉफ, सदस्य कवीश ठकवानी, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापिका उर्मिला जुल्का, क्रेडाई पुणे मेट्रो व कुशल क्रेडाईच्या सदस्या पल्लवी कोठारी, प्रशिक्षण प्रमुख व कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी आदी या वेळी उपस्थित होते.

    राष्ट्रीय पातळीवर होणा-या या स्पर्धेतील यशस्वी कामगार पुढे १२ ते १८ ऑक्टोबर, २०२२ दरम्यान चीनमधील शांघाय येथे होणा-या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या जागतिक स्पर्धेसाठीदेखील कुशल क्रेडाईच्या वतीने त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. जगभरातील ४६ देशांमधून ६ प्रमुख विभागांमध्ये ही स्पर्धा होणार असून तरुणांना एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या सहा विभागांमध्ये बांधकाम उद्योगासोबतच, आयटी, उत्पादन क्षेत्र, आदरातिथ्य, डिजिटल कौशल्ये, माध्यमे आणि जागतिक दर्जाचे मानक तंत्र विकसित करणे आदी क्षेत्रांचा देखील अंतर्भाव आहे.

    आजवर २०१५ साली ब्राझील, २०१७ साली दुबई येथील अबू धाबी व २०१९ साली रशिया येथील कझान या ठिकाणी झालेल्या जागतिक स्पर्धांमध्ये क्रेडाई कुशल हे उत्कृष्टता पदकाचे मानकरी ठरले आहेत. या कार्यक्रमावेळी बोलताना अमर मांजरेकर म्हणाले, "कामगारांनी केलेले शास्त्रशुद्ध विटांचे काम व बांधकाम पाहून मला आनंद झाला. त्यांनी केलेल्या बांधकामामध्ये केवळ शून्य ते १ एमएमच्या त्रुटी आहेत ही आश्चर्याची बाब आहे, असे मला वाटते. याबरोबरच एनएसडीसी टास्क फोर्सचे अध्यक्षपद मिळविल्याबद्दल मी जेपी श्रॉफ आणि त्यांच्या टीमचे देखील अभिनंदन करतो."