पिरंगुट येथील रासायनीक कंपनीत आग प्रकरण
पुणे : परवाना नसताना जंतुनाशकांचा (सॅनिटायझर) मोठय़ा प्रमाणात केलेला साठा आणि कामगारांच्या सुरक्षिततेबाबत केलेला निष्काळजीपणा यांमुळेच मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील रासायनीक कंपनीत आग लागून १८ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.
तसेच मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना मदत दिली असल्याचेही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. विधिमंडळ अधिवेशनात विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना कामगार मंत्री मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 'मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्रातील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी या रासायनीक कंपनीत चालू वर्षी ५ जून रोजी भीषण आग लागून १५ महिला आणि तीन पुरुष अशा १८ कामगारांचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी मावळचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या अहवालात कामगारांची माहिती, कारखाना मालकाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने दिलेल्या परवान्याव्यतिरिक्त ज्वालाग्राही पदार्थाचा साठा मोठय़ा प्रमाणात केला होता. याबाबतची माहिती औद्योगिक सुरक्षा, आरोग्य संचालनालयाला देण्यात आली नव्हती. कारखाना व्यवस्थापनाने क्लोरीन डाय ऑक्साइडपासून पावडर आणि जेल या प्रकारात बनवण्यासाठी परवाना प्राप्त केला होता. मात्र, घटनेच्या दिवशी कारखान्यात मोठय़ा प्रमाणात जंतुनाशकाचा साठा करण्यात आला होता. सोडियम क्लोराइट पावडर पॉलिथीन पाउचमध्ये भरून लाखबंद करण्याचे काम करण्याच्या यंत्रामुळे अधिक उष्णता निर्माण होऊन पावडरने पेट घेतला. कारखान्यात असलेल्या जंतुनाशकाच्या साठय़ामुळे आग मोठय़ा प्रमाणात पसरली.'
आगीत मृत्यू झालेल्या १७ पैकी १६ कामगारांच्या वारसांना राज्य कामगार विमा महामंडळाकडून शेवटच्या वेतनाच्या ९० टक्के रक्कम प्रतिमाह निवृत्तिवेतन चालू झाले आहे. एका मृत महिला कामगाराच्या अवलंबिताचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त असल्याने महामंडळाच्या नियमाप्रमाणे ते निवृत्तिवेतनासाठी पात्र नाहीत. तसेच राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख, मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी एक लाख असे पाच लाख रुपये यानुसार एकूण ८५ लाख रूपये, तर आगीत जखमी झालेल्या दोन कामगारांना राज्य आपत्ती निधीमधून प्रत्येकी १२ हजार ७०० रुपये आर्थिक मदत देण्यात आल्याचेही कामगार मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
केंद्र शासनाकडून प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर झाली आहे. कारखाना व्यवस्थापनाने मृत कामगारांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये देऊ केले असून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आले आहेत, तर उर्वरित पाच लाख रुपये रकमेचे धनादेश डिसेंबर २०२१ महिन्यातील तारखेने दिले आहेत. याशिवाय मृत कामगारांच्या पाल्यांचे पदवीपर्यंतचे शैक्षणिक शुल्क देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले असून कारखाना सुरू झाल्यानंतर वारसांना नोकरी देण्याचे मान्य केले आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.