पिंपरी : प्रस्तावित कामगार कायदे कायमस्वरुपी रद्द करावेत या मागणीसाठी देशभरातील सर्व कामगार संघटनांनी 23 आणि 24 फेब्रुवारी 2022 ला भारत बंदचा नारा दिला आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीसह जिल्ह्यातील औद्योगिक पट्यांतील देखील हे दोन दिवस सर्व कारखाने, आस्थापना बंद ठेवून नागरीकांनी भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे असे वृत्त MPC News वृत्तसंस्थेने दिले आहे.
काल (दि.30) आकुर्डीतील श्रमशक्ती भवन येथे कामगार संघटना कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. कैलास कदम, मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, ज्येष्ठ कामगार नेत्या लता भिसे, वसंत पवार, गणेश दराडे, अरविंद जगताप, निरज कडू, अनिल रोहम, दिलीप काकडे, एस. पी. शिवकुमार, एम. आर. सचिन, विशाल भेलकर, सुभाष कालकुंद्रीकर, मोहन पोटे आदी उपस्थित होते.
केंद्र सरकार मागील सात वर्षांपासून कामगार क्षेत्रात अस्थिरता निर्माण करुन भांडवलदारांना पुरक ठरतील असे निर्णय घेत आहे. शेतकरी व कामगारांचे आर्थिक शोषण करुन देशातील गोरगरीब जनतेला भांडवलदारांचे गुलाम बनविण्याचे धोरण मोदी सरकारचे आहे. संघटीत व असंघटीत अशा सर्व क्षेत्रातील कामगारांना जाचक ठरतील असे चार कामगार कायदे केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.