एसटी कर्मचारी संपाला राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचा जाहीर पाठिंबा

कोल्हापूर : सध्या राज्यामध्ये दळणवळणाचा मुख्य कणा असलेल्या एसटी कर्मचारी यांचा न्याय - हक्क मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे. अनेक कामगार / कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येसारखे मार्ग निवडले आहेत व हे सत्र अद्यापही सुरूच आहे. यावरूनच त्यांच्या समोर असलेल्या भविष्यकालीन अडचणी व भीषण परिस्थितीचे अवलोकन होते.

      महाराष्ट्र शासनाच्यावतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या असे जाहीर करणेत आलेले आहे. जरी हे शासनाचे महामंडळ असले तरी, यामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य व केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे नियमित लाभ व सुविधा मिळत नाहीत. या महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस काम करून देखील तुटपुंजे वेतन मिळत आहे. सेवा निवृत्तीनंतरही नाममात्र पेन्शन मिळते हि अतिशय खेदाची व दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळाचे, महाराष्ट्र शासनाकडे विलिगीकरण होणे आवश्यक आहे.

         एस. टी. महामंडळाच्यावतीने आजघडीला दोन हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित करून हि बाब न्यायप्रविष्ट करणेचे प्रयत्न सुरू आहेत. आजअखेर राज्यामध्ये व देशामध्ये न्याय - हक्क मागण्यांसाठी, अनेक आंदोलने झालेली आहेत. किंबहुना आपल्या देशाला सुद्धा आंदोलनाच्या माध्यमातूनच स्वातंत्र्य मिळालेले आहे. त्यामुळे महामंडळाकडून निलंबन करणे हि चुकीची व अन्यायकारक पद्धत अवलंबिली जात आहे.

         सदर संपास "राज्य गुणवंत कामगार असोसिएशन"च्यावतीने जाहीर पाठिंबा देणेच्या हेतूने, राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक - राज्य परिवहन महामंडळ यांना मेलद्वारे लेखी निवेदने पाठवून एसटी कर्मचारी यांच्या न्याय - हक्क मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात व एस.टी. महामंडळाचे महाराष्ट्र शासनाकडे विलिगीकरण करून, कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा तसेच राज्यातील प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत अशी आग्रही मागणी करणेत आली आहे .

    यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. यावेळी महादेव चक्के, भगवान माने, शिवाजी चौगुले, संभाजी थोरात, सुभाष पाटील, प्रवीण भिके, भास्कर शिंदे, सर्जेराव पाटील, संजय सासणे, मुनीर मुल्ला, वसंत डावरे, अशोक खाडे, सर्जेराव हळदकर, अनिता काळे, दत्तात्रय पाटील, यशवंत पाटील गुणवंत कामगार प्रातिनिधीक स्वरूपात उपस्थित होते.