आता देशभर जुन्याच कामगार कायद्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी लढा उभारुया - डॉ.कैलास कदम

पिंपरी : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी प्रस्तावित तीनही काळे कायदे मागे घेतले असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.१९ नोव्हेंबर) सकाळी केली. हे देशभरातील नागरिकांच्या एकजुटीचे यश आहे. आता कामगारांविरोधी केलेले प्रस्तावित चार कायदे रद्द करुन आता देशभर जुन्याच कामगार कायद्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी लढा उभारुया, असे आवाहन कामगार नेते व पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

     पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या पदाधिका-यांनी लाडू वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ओबीसी नेते प्रताप गुरव, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माजी प्रदेश अध्यक्षा शामला सोनवणे, एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे तसेच हिराचंद जाधव, ज्ञानेश्वर मलशेट्टी, दिलीप पवार, किशोर ढोकले, काशीनाथ नखाते आदी उपस्थित होते.

    यावेळी डॉ कदम म्हणाले, मागील अकरा महिन्यांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला शुक्रवारी यश आले. पंतप्रधान मोदी यानी सकाळी नऊ वाजता जाहिर केले की, तीनही प्रस्तावित शेतकरी कायदे मागे घेत आहोत. या महिन्यात होणा-या संसदीय अधिवेशनात याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यात येतील. हे यश म्हणजे मागील अकरा महिन्यांपासून देशभर शेतकरी आणि कामगारांनी या कायद्यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाचे यश आहे. देशातील बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेससह इतर मित्र पक्षांनी आणि इंटकसह इतर कामगार संघटनांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरुन विविध प्रकारे आंदोलने केली होती.

     पिंपरी-चिंचवड शहरामध्ये देखील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आणि विविध शेतकरी संघटनांच्या वतीने पुणे नाशिक महामार्गावर मोशी येथे रास्ता रोको आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला होता. अशाच प्रकारची विविध आंदोलने शहरात करण्यात आली होती.