सिटू अखिल भारतीय जनरल कौन्सिलचा महाराष्ट्रातील एसटी कामगार संपाला पाठिंबा जाहीर

हैदराबाद : हैदराबाद येथे सुरू असलेल्या सीआयटीयुच्या अखिल भारतीय जनरल कौन्सिल बैठकीत राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी महाराष्ट्रातील एसटी कामगारांच्या संपाला संपूर्ण पाठिंबा जाहीर करणारा ठराव मांडला व बैठकीने एकमताने मंजूर केला. महाराष्ट्रात सिटू राज्य कमिटी व विविध जिल्हा कमिट्यांनी सुरवातीपासूनच सक्रीय पाठिंबा दिला आहे. 


     एसटी ही सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे परंतु राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळ आणि कामगारांना न्याय दिलेला नाही. पैसे कमवून देणाऱ्या मार्गांवर खाजगी वाहतुकीला पूर्ण वाव दिला जात आहे. दूरवरच्या गावांमध्ये आणि खडतर मार्गांवर मात्र नफा, नुकसान यांचा विचार न करता एसटीची लालपरी आणि तिचे कामगार अहोरात्र सेवा देत आहेत. 


    या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कामगारांच्या सर्व न्याय्य मागण्या मान्य करून संपात ताबडतोब तोडगा काढावा. व संप सन्मानजनक पद्धतीने मिटवावा, कामगारांवर केलेल्या सर्व शिस्तभंगाच्या कारवाया मागे घ्याव्यात. अशी मागणी या ठरावाच्या माध्यमातून सिटूने केली आहे.