नाईक सूतगिरणी कामगार व कर्मचाऱ्यांना 9.5 टक्के बोनस

पुसद : विदर्भामध्ये एकमेव सुरू असलेली बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीत कार्यरत असलेले 60 कर्मचारी व 300 कामगारांना वर्षभरात मिळणार्‍या एकूण वेतनावर तब्बल 9.5 टक्के बोनस देण्याचा निर्णय उपाध्यक्ष ययाती नाईक व संचालक मंडळाने घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी सूतगिरणीचे अध्यक्ष राजेश आसेगावकर यांनी सुरू केली आहे. सूतगिरणीच्या इतिहासात प्रथमच साडेनऊ टक्के बोनस कामगारांना देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याने कामगारांच्या वतीने सूतगिरणीचे अध्यक्ष राजेश आसेगावकर, उपाध्यक्ष ययाती नाईक व कार्यकारी संचालक पाथरी तसेच संचालक मंडळाचे अभिनंदन करून आभार मानले आहे असे वृत्त तरुण भारत नागपूर वृत्तसंस्थेने दिले आहे.

     बाबासाहेब नाईक सूतगिरणी ही महाराष्ट्रात दुसर्‍या क'मांकावर आणि विदर्भात पहिल्या क्रमांकावर आहे. या सूतगरिणीतील 'टीएफओ' या अद्ययावत यंत्रावर तयार करण्यात आलेल्या दर्जेदार सुताला सातासमुद्रापारही मोठी मागणी आहे. माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या मार्गदर्शनात ही बाबासाहेब नाईक सूतगिरणी सुरू असून विशेष म्हणजे या गिरणीतून निघणारे सूत चीनला निर्यात केले जात आहे.

    माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कुशल मार्गदर्शनात जागतिक बँकेचे कर्ज मिळवून ही सूतगिरणी उभी करण्यात आली होती. या सूतगिरणीने अनेक चढउतार पाहिले आहेत. परंतु शेतकरी सभासदांचे व कर्मचारी कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून सूतगिरणीचे वाटचाल सुरू आहे. या सूतगिरणीचे अनेक दिग्गज नेत्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. यामध्ये माजी मंत्री डॉ. एन. पी. हिराणी, माजी मंत्री मनोहर नाईक, डॉ. एम. डी. राठोड होते.

    त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत राजेश आसेगावकर यांनी सूतगिरणी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच गिरणीला खरोखर अच्छे दिन आले आहेत. उपाध्यक्ष ययाती नाईकसुद्धा यात लक्ष घालून आहेत. कामगार व कर्मचार्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सूतगिरणीची वाटचाल सुरू असून कामगार व कर्मचारी हितार्थ 9.5 टक्के बोनस यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.

    राजेश आसेगावकर यांनी अध्यक्ष होण्यापूर्वीच कोरोना काळात चारशे अन्नधान्य किट्स कर्मचार्‍यांना वाटप केल्या होत्या. अध्यक्ष झाल्यानंतर स्वत: प्रशासन इमारतीला रंगरंगोटी करून घेतली कामगारांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून सूतगिरणीमध्ये वॉटर कूलर बसून दिले मागील वर्षी तीन महिने कोरोनामुळे सूतगिरणीचे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून याही कालावधीत कामगार व कर्मचार्‍यांना पगार देण्यात आला होता.