देशव्यापी बंद ला कामगार संघटनांचा पाठिंबा

पुणे : कृषी विधेयकाच्या निषेधार्थ २७ सप्टेंबर रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. देशव्यापी बंदमध्ये मार्केटयार्डातील सर्व कामगार संघटना सहभागी होणार आहेत. मार्केटयार्डातील कामगार संघटनांची बुधवारी बैठक पार पडली असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, हमाल पंचायतीचे हुसेन पठाण, महाराष्ट्र राज्य जनरल ट्रान्सपोर्ट कामगार युनियनचे सचिव संपत धोंडे, तोलणार संघटनेचे राजेश मोहोळ, टेम्पो पंचायतीचे उपाध्यक्ष गणेश जाधव, महात्मा फुले कामगार संघटनेचे राजू पवार, भारतीय कामगार सेनेचे दादा तुपे, टेम्पो सेनेचे राजू रेणुसे, संजय साष्टे, बाळासाहेब जाधव आदी याप्रसंगी उपस्थित होते. बाजार आवारातील शेतकरी मुख्य घटक आहे.

कृषी विधेयकामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे बाजार आवारातील कामगार वर्गावर मोठा परिणाम होणार आहे. कृषी विधेयकाच्या निषेधार्थ पुकारलेल्या देशव्यापी बंदला कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असल्याचे संघटनांनी सांगितले.