केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी तीन कार्पोरेट धार्जिणे शेतीविषयक कायदे तात्काळ रद्द करावेत, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाचा विचार करून किमान हमी भाव देणारा कायदा करावा, नुकत्याच केलेल्या कामगार कायदा मधील कामगार विरोधी बदलाच्या चार श्रम संहिता रद्द कराव्यात, कामगार कायद्यांमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी सर्व कामगार संघटनांशी खुला विचारविनिमय करावा व प्रचलित कामगार कायद्यांची अंमलबजावणी करावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी या मागण्यांसाठी देशव्यापी भारत बंदमध्ये बारामती एमआयडीसीतील कामगार संघटनांनी भाग घेतला आणि त्यांनी निदर्शने केली असे वृत्त महान्यूज लाईव्ह वृत्तसंस्थेने दिले आहे.
बारामतीतील ग्रीव्हज कॉटन अँड कंपनी एम्प्लॉईज युनियन, पियाजिओ व्हेईकल प्रायव्हेट लिमिटेड, पुना एम्प्लॉइज युनियन, त्रयामुर्ती इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड बारामती व बेलमोन्ट स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर, भारतीय कामगार सेनेच्या सुयश ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगारांनी यामध्ये सहभाग घेतला.
येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर या कामगारांनी निदर्शने केली. 27 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंद मध्ये बारामती एमआयडीसीतील वरील कंपनीतील कामगार सहभागी असल्याचे या कामगार संघटनांनी स्पष्ट केले. केंद्रातील सत्तारूढ असणाऱ्या भाजप सरकारने देशात कामगार कायद्यान्वये अत्यंत भयानक असे कामगार विरोधी कायदे केलेले आहेत. कामगारांची सेवा सुरक्षा, वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा यामुळे धोक्यात आलेले आहे.
कोरोना काळातील शांततेचा फायदा घेऊन संरक्षण, विमा, बँका सारख्या मूलभूत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम देखील विकण्याच्या हालचाली सुरू आहेत. सर्वत्र कंत्राटीकरण सुरू आहे. कोरोना काळात कोट्यावधी लोकांचा रोजगार गेलेला आहे. अतिवृष्टी, कमी पाऊस, शेतीमालाला कवडीमोल भाव आणि नापिकीमुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आलेला असताना त्यांना मदत दिली जात नाही आणि याच वेळी बऱ्याच जागतिक व्यापारी कंपन्यांच्या दावणीला शेती बांधणारे तीन काळे कायदे सरकारने केलेले आहेत या संदर्भात हा बंद आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते यामध्ये तानाजी खराडे, सचिन चौधर, अशोक इंगळे, हनुमंत गोलांडे, सुनील शेलार या युज कॉटन अँड कंपनी च्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता त्याचबरोबर भारतीय कामगार सेनेचे भारत जाधव, पोपट घुले, सोमनाथ भोंग या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
पुना एम्प्लॉईज युनियनचे भाऊ ठोंबरे, मनोज सावंत, सचिन घाडगे, राहुल ठोंबरे, लीलाचंद्र ठोंबरे, संदेश भैय्या, आणि याच युनियनच्या इंदापूर मधील लालासाहेब ननवरे, सचिन देवकाते, जयकुमार साळुंखे, बुवासाहेब राऊत, सचिन गोफणे, दिपक शिंपी, भटू हुलगे यांचा समावेश होता.
