स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत घेणे व कायम करणे बंधनकारक - कामगार नेते यशवंतभाऊ भोसले

नीरा,पुरंदर : कामगार कायदा आणि शासन आदेश नुसार कंपन्यांनी ८०% टक्के स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरीत घेणे आवश्यक आहे. मात्र तसे न होता उद्योगपती ठेकेदारी पद्धतीने कामगार भरून ठेकेदार यांना पोसत असून ठेकेदाराच्या घशात कंपनी मलिदा घालत आहे असे मत राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केले. ज्युबिलंट कामगार संघटनेच्या वतीने नीरा ( ता. पुरंदर) येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात कामगार मेळावा पार पडला.याप्रसंगी ते बोलत होते.

      यशवंतभाऊ भोसले पुढे म्हणाले की, नीरा येथील ज्युबिलंट कंपनी मध्ये नव्वदच्या दशकामध्ये तीन प्लांटमध्ये सहाशे कायम कामगार होते आता पाच प्लांटमध्ये सत्तर कायम कामगार व बाकीचे सर्व कंत्राटीच आहेत. कंपनीने त्वरित कंत्राटी कामगारांना कायम करावे आणि ८०% भूमिपुत्रांना नोकऱ्या द्याव्यात अन्यथा संघर्ष अटळ आहे.

    स्थानिकांना रोजगारनिर्मिती व्हावी म्हणूनच सरकार कंपन्यांना पायघड्या घालते. १९६८ साली केंद्रसरकारने केलेल्या कामगार कायद्यानुसार कंपन्यांनी ८० टक्के स्थानिक लोक नोकरीला घ्यावेत असा कायदा केला आहे. स्थानिक बेरोजगारांचा कंपनीच्या नोकरीवर पहिला अधिकार असून यासाठी तब्बल दीड हजार तरुणाचे नोकरीसाठीचे अर्ज मोहीम तयार करणार आहे.

    स्थनिकांना रोजगार मिळतो कि नाही याची अंमलबजावणी करण्यासाठी विकास आयुक्त यांच्या सह नऊ जणांची शासकीय कमिटी आहे. परंतु या कमिटीने कंपन्यांची पडताळणी केली नाही, आदेशही दिले नाही यामुळे या कायद्याचे तरतुदीचे भंग होणार असल्यास कमिटीवरच फौजदारी गुन्हा दाखल करू’ असा इशारा देत १५ सप्टेंबर रोजी हजारो आम्ही कंपनीच्या दारावर आंदोलन करू असा इशाराही भोसले यांनी दिला आहे.

    यावेळी जेष्ठ नेते बी. जी. काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक विलास काकडे, माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण, दिलीप फरांदे, शशिकांत काकडे, विजयराव काकडे, टी. के. जगताप, धैर्यशील काकडे, राजेंद्र काकडे, अजित काटे, निंबुत ग्रामपंचायत सदस्य सतीश काकडे, संभाजी काकडे, माऊली निगडे, गोरख निगडे, रमेश जेधे, किरण निगडे, युनियनचे उपाध्यक्ष शिवाजी लोखंडे, सचिव अनिल कोंडे, दिलीप अडसूळ, योगेश निगडे, उदय गायकवाड, चेतन सकुंडे, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.