कामगार संघटना यांच्यासाठी श्रमिक एकता महासंघाच्या वतीने व इंडस्ट्री ऑल ग्लोबल युनियनच्या सहकार्याने मार्गदर्शन शिबीर संपन्न

पुणे : श्रमिक एकता महासंघाच्या वतीने व इंडस्ट्री ऑल ग्लोबल युनियनच्या सहकार्याने महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व सेक्टर मधील कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची लोकल एरिया मीटिंग रविवारी दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी हॉटेल निओ वुड्स, चिंचवड येथे कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करून सभा पार पडली. 

      मीटिंगमध्ये कामगार कायद्यामध्ये होणारे बदल याबाबत माहिती व त्याची पूर्वनियोजित तयारी, सध्याची औद्योगिक परिस्थितीवर चर्चा, असंघटित कामगार, कोविड -१९ ची परिस्थिती- पुर्वीची आणि आत्ताची, हेल्थ अँड सेफ्टी इत्यादी विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

       श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार,महासंघाचे सल्लागार अरविंद श्रौती, मारुतीराव जगदाळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक व किमान वेतन सल्लागार मंडळाचे सदस्य केशव घोळवे साहेब  तसेच महासंघाचे इतर पदाधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

    श्रमिक एकता महासंघाचे सह सेक्रेटरी श्री विकास कर्पे यांनी सुत्रसंचालन केले आणि महासंघाचे सेक्रेटरी श्री मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये महासंघाचे मुख्य उद्देश व विजन यांची माहिती देण्यात आली.

      महासंघातील संलग्न संघटनांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधितज्ञ ऍड. कॉम्रेड संजय सिंघवी साहेब यांनी कामगार कायदयामध्ये झालेले बदल आणि त्याचा कामगारांवर, कामगार संघटनांवर आणि औद्योगिक क्षेत्रावर काय परिणाम होतील याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर फिक्स टर्म वर्कमन, कॉन्ट्रॅक्टर व कॉन्ट्रॅक्ट वर्कर यासंबंधीच्या तरतुदी बद्दल संपूर्ण माहिती दिली तसेच त्याबाबत संघटनांनी कसं सामोरं जायला पाहिजे काय धोरण असायला पाहिजे, संघटनेच्या बांधणी/स्थापने वरती आणि कामकाजावर येणारे अपेक्षित निर्बंध यावरही यामध्ये चर्चा तसेच प्रश्नोत्तरे करण्यात आली.

    इंडस्ट्री ऑल ग्लोबल युनियन कडून श्री प्रवीण राव यांनी इंडस्ट्री ऑल जगामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत आहे याची माहिती दिली तसेच इंडस्ट्रिऑल कडून कामगारांमधील युनिटी मजबूत कशी करता येईल याची माहिती दिली तसेच इंडस्ट्री ऑल त्याच्या विविध औद्योगिक क्षेत्रामध्ये कशाप्रकारे मदत केली जाते याचे उदाहरणासहित सर्वांना माहिती दिली.

    श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार श्री अरविंद श्रोत्री यांनी इंडस्ट्रियल रेवोल्युशन, इंडस्ट्री 4.0, टेक्नॉलॉजी, IOT (Internet Of Things) यांच्यामुळे कोण कोणत्या औद्योगिक क्षेत्रांवर परिणाम होणार आहे याचा डेटा सहित माहिती दिली तसेच जागतिक लेव्हल ला जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, रशिया, चीन, जपान इत्यादी देशांची इंडस्ट्रियल रेवोल्युशन बाबतची तयारी व त्यातून निर्माण होणारी संधी इत्यादींची उदाहरणांसहित माहिती दिली. 

      श्रमिक एकता महासंघाचे प्रमुख  सल्लागार मारुतीराव जगदाळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कामगार कायद्याचे रूपांतर नवीन चार कोड मध्ये होत असले तरीही घाबरण्याचे कोणतेच कारण नसून त्याला सामोरे कसे जायचे व त्याची अंमलबजावणी कशी करून घ्यायची याचे पूर्ण तंत्रशुद्ध मार्गदर्शन मारुतीराव जगदाळे सरांनी केले तसेच युनियनने त्यांच्या कंपनीतील दैनंदिन कामकाजामध्ये Factory Act, Industrial Dispute Act, MRTU Act, Standing Order हे कामगार कायदे  त्यांचे नियमित पालन कसे करता येईल व कोण कोणत्या प्रमुख कायद्यांमध्ये आस्थापनेतील सर्वच कामगारांना त्याची माहिती कशी द्यावी याचे पूर्ण मार्गदर्शन केले  तसेच कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स संदर्भात मार्गदर्शन केले.

     श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार माननीय केशव घोळवे यांनी श्रमिक एकता महासंघाच्या पुढील ध्येय धोरण व उद्दिष्टांसाठी त्यांचा स्वतःचा एक कामगार म्हणून पाठिंबा असेल व त्याबाबत त्यांचे पूर्ण सहकार्य राहील तसेच त्यांनी युनियन आणि व्यवस्थापन यामध्ये पुढील काळामध्ये कोणत्या स्वरूपाचे संवाद होणे गरजेचे आहे त्याबद्दल मार्गदर्शन केले.

      श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष व बजाज ऑटो मधील विश्व कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री दिलीपराव पवार यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये महासंघाची यशस्वी चालू असलेली वाटचाल त्यामध्ये संघटनांचा सक्रिय सहभाग कशा प्रकारे असतो याची माहिती दिली सरकारचे कामगारांबाबत विरोधी होत असलेले धोरण व त्याचा परिणाम संघटनांवर पडू न देता एकत्र येऊन सर्वांनी कशाप्रकारे लढले पाहिजे याची काही कायद्यातील मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.

    महासंघाचे सह सेक्रेटरी विकास कर्पे यांनी आभार प्रदर्शन करुन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.