स्थानिकांना कायम नोकरी न दिल्यास आंदोलन

निरा,बारामती : ज्युबिलंट कंपनीत सहाशे- सातशे कामगार कायम होते. आता फक्त सत्तर राहिलेत. शेकडो लोक ठेकेदारी पद्धतीने आयुष्य कंठत आहेत. कंपनीत ८० टक्के कामगार स्थानिक हवेत तसेच सतत चालणाऱ्या कंपनीत कामगार 'कायम'च असावेत असे कायदे आहेत.त्यानुसार ज्युबिलंटने कंत्राटी पध्दत बंद करावी आणि पंचक्रोशीतील भूमिपुत्रांना कायम नोकरी द्यावी. अन्यथा पंधरा दिवसांनी हजारो लोकांसह गेटवर आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे राज्याचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी दिला असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

     नीरा (ता. पुरंदर) येथे ज्युबिलंट कामगार युनियन व राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते बी. जी. काकडे यांच्या हस्ते यशवंत भोसले यांचा राष्ट्रीय श्रमिक संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

      ज्युबिलंटने सस्पेंड केलेल्या सर्व कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे. प्रदूषण सहन करणाऱ्या गावांमधून दीड हजार मुलांचे अर्ज स्वीकारून मुलाखतीद्‍वारे कायम कामगार निवडावेत. ज्युबिलंटच्या प्रदूषणाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. विषारी वायू गळतीमुळे कित्येक बाधित झाले. भूमिपुत्रांना रोजगार मिळावा म्हणून लोक हे सहन करतात. आता कंपनीने कंत्राटी पध्दत बंद केली नाही तर कंपनीचे नोंदणीपत्र रद्द करावे अशी मागणी सरकारकडे करणार आहे. स्थानिक लोकांनीही भूमिपुत्रांच्या हक्काच्या लढाईमध्ये सामील व्हावे, असे आवाहन भोसले यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण, गोरख निगडे यांनी मनोगत व्यक्त केले.

     याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक विलास काकडे, विक्रम काकडे, अजित जगताप, शशिकांत काकडे, विजय काकडे, सुनील चव्हाण, धैर्यशील काकडे, राजेंद्र काकडे, अजित काटे, अनिल कोंडे, दिलीप अडसूळ, प्रवीण जाधव उपस्थित होते.प्रस्ताविक रमेश जेधे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब बारवकर यांनी केले. तर आभार शिवाजी लोखंडे यांनी मानले.

जिल्ह्यातील सरपंचांना आवाहन

प्रत्येक तालुक्यात कारखाने आहेत. परंतु, गावोगावचे पुढारी, सरपंच यांना कंपनीकडे ठेका मागण्यात धन्यता वाटते. प्रत्येक गावच्या सरपंचाला सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या मुलासाठी ठेका मागून मिंधे होऊ नका, त्याऐवजी स्थानिक भूमिपुत्रांना पर्मनंट नोकऱ्या द्याव्यात, असा आग्रह करावा; अन्यथा कंपनीचा परवाना रद्द करण्याची मागणी करा, असे आवाहन भोसले यांनी केले.