मुंबई : उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात. मात्र, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील रोजगारावर काम करणारा नोकरदारवर्ग, कामगारवर्ग ही तर उद्योगाची महत्वाची चाके जी अविरतपणे झटत असतात. त्यांच्यावरच संकट कोसळले आणि त्यांना जर आधार दिला नाही तर समाजात अस्थिरता निर्माण होईल. अशावेळी ऑल इंडिया मिडीया एम्प्लॉईज असोसिएशनने (आयमा) या कोविड महामारीच्या काळात नोकरदारवर्गाच्या मागे खंबीरपणे उभे राहून अनेकांना त्यांच्या नोकरीवर येणाऱ्या गडांतराला आव्हान देत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. जिथे जिथे शक्य होईल तिथे व्यवस्थापणाशी संघर्ष करून त्यांना विविध मार्गाने आधार देण्यात आला. आयमाच्या या उल्लेखनीय कामाची दखल घेत दिनांक १९ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल मा.भगतसिंगजी कोश्यारी यांच्या हस्ते आयमाचे अध्यक्ष श्री गोरक्षजी धोत्रे यांना राजभवन येथे ‘मुंबई रत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एकूण ३१ निवडक व्यक्तींना या प्रसंगी गौरविण्यात आले. या मध्ये गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी, वकील उज्ज्वल निकम, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अनंत गोयनका, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गौतम भन्साळी, पार्श्वगायक उदित नारायण, भजन सम्राट अनुप जलोटा, युनियन बँकेचे अध्यक्ष राजकिरण राय अश्या भारतातील प्रमुख मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिल्यास देश आत्मनिर्भर निश्चितच होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कार्यक्रमा दरम्यान केले. फिल्म्स टुडे, नाना नानी फाऊंडेशन व एनार समूहातर्फे हा पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला फिल्म्स टुडेचे अध्यक्ष श्याम सिंघानिया व राजेश श्रीवास्तव उपस्थित होते.
या संदर्भात अधिक माहिती घेताना पुरस्कारप्राप्त गौरक्ष धोत्रे यांना विचारले असता ते म्हणाले की, "आयमाचे सरचिटणीस अजय घाटे, खजिनदार राजेंद्र दळवी यांचा या अवॉर्ड मध्ये मोठा वाटा आहे. त्यांच्या शिवाय हे शक्य नव्हते. हे टीम वर्क होते. कामगार चळवळीतील जेष्ठ नेते सुभाष मळगी, राजेश उज्जैनकर यांच्या मार्गदर्शनामुळे हे शिव धनुष्य पेलणे शक्य झाले. त्याचबरोबर आमच्या सिने वर्करचे सरचिटणीस संतोष बनसोडे, अनिल भदरगे, नवीन करमियानी अशी अनेकजण आहेत. त्या सर्वांच्या मेहनतीचे हे फळ आहे. मी तर फक्त चेहरा आहे. खरे मानकरी तर हे आहेत. हा पुरस्कार मी त्याच्या वतीनेच स्वीकारला आहे. त्यामुळे या सर्वाचे मी मनःपूर्वक जाहीर आभार व्यक्त करतो व त्याचे देखील या निमित्ताने अभिनंदन करतो."