औरंगाबाद : वाळुज एमआयडीसी मधील एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने (Exide Industries Limited) माथाडी कायदा लागू करावा तसेच कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे या मागणीसाठी संघर्ष जनरल श्रमजीवी कामगार संघटना यांच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण आज (दि.२६ जुलै) चालू करण्यात आले याबाबत संघटनेच्या वतीने अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी पुढील माहिती दिली.
वाळुज एमआयडीसी मधील एक्साईड बॅटरी लिमिटेड येथे काम करणारे कामगार यांनी कंपनी मध्ये महाराष्ट्र शासनाचा माथाडी कायदा राबविणे, कामगारांची माथाडी मंडळांमध्ये नोंद करणे, कामावरून काढलेल्या कामगारांना कामावरती घेणे व इतर मागण्यासाठी वेळोवेळी विनंती अर्ज केले.
तसेच त्या बाबत माहिती अध्यक्ष व सचिव औरंगाबाद जिल्हा माथाडी व संरक्षित कामगार मंडळ यांना देखील दिली होती. त्यानुसार माथाडी मंडळ औरंगाबाद यांनी एक्साईड बॅटरी कंपनीला माथाडी कायदा राबवण्यासाठी पत्र दिले.
परंतु कंपनीने यासंदर्भात कोणतीही गंभीर दाखल न घेतल्यामुळे कामगारांनी दिनांक १५ जुलै २०२१ पासून एक्साईड बॅटरी कंपनीच्या गेटसमोर परिवारासह दिवसाचे चक्री उपोषण केले. परंतु याबाबत देखील कंपनीने कोणतीही दखल घेतली नाही तसेच माथाडी कार्यालयाने केवळ कागदी घोडे नाचवून आस्थापनाला एक प्रकारे पाठिंबा दिलेला आहे
त्यामुळे कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असून संघटनेच्यावतीने कामगार उपायुक्त कार्यालय यांच्यासमोर आमरण उपोषण सुरू केले असून माथाडी कायदा त्वरित एक्साईड बॅटरी कंपनी मध्ये लागू करावा अशी मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, सचिव सुधीर खैरे, राजू अल्लाट, सचिन भिंगारे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केले आहे. विजय थोरात, अशोक बोधक, सिद्धार्थ धबाले, राहुल धनके, नीलम यादव हे आपल्या कुटुंबासह आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहेत.