लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांच्या कृती आराखड्यासाठी प्रयत्नशील – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव : लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांचा कृती आराखडा बदलण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. तसेच कोविड-१९ मध्ये जीव गमावलेल्या विविध पालिका कर्मचाऱ्यांना शासनातर्फे न्याय देण्याबाबत निर्णय घेऊ. असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज पाचोरा येथे केले.

पाचोरा नगरपरिषदे अंतर्गत विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त आयोजित पाचोरा येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना मंत्री शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील वाढते नागरीकरण व शहरांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी सध्या लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांचे प्रमाण विसंगत असल्याने याबाबतचा कृती आराखडा बदलण्याबाबत नगरविकास विभागामार्फत सकारात्मक विचार करण्यात येईल.

मंत्री शिंदे पुढे म्हणाले की, राज्यात वाढते नागरीकरण लक्षात घेऊन शहरांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. शहरांची स्वच्छता राहावी याकरिता सफाई कामगारांची संख्या वाढविणे आवश्यक आहे त्यामुळे याबाबतचा कृती आराखडा बदलण्याबाबत नगर विकासविभाग प्राधान्याने विचार करेल.  त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना विमाकवच देण्याबाबतही विचार करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पाचोरा नगरपरिषदेतर्फे शहरात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण आज राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सर्वश्री. किशोर आप्पा पाटील, चिमणराव पाटील, उदेसिंग राजपूत, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष संजय सावंत आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास नगराध्यक्ष संजय नाथालाल गोहील, उपनगराध्यक्षा प्रियंका वाल्मिक पाटील, मुख्याधिकारी श्रीमती.शोभा बाविस्कर आदींसह नगरपरिषदेतील विविध पक्षांचे गटनेते, स्थायी समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, नागरीक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.