पुणे : केंद्र सरकारने देशभरातील सर्व ४१ दारूगोळा निर्मिती कारखान्यांचे (ऑर्डनन्स फॅक्टरीज) निरगमीकरण ( कॉर्पोटायझेशन) करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. केंद्राच्या निर्णयाविरोधात शुक्रवारपासून देशभर आंदोलने सुरु झाली असून शनिवारी दुपारी देहूरोड येथील आयुध निर्माणीतील सर्व कामगार संघटनाच्या संयुक्त समितीने एकत्रितरित्या केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. देहूरोड पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डा (ordnance factory board)अंतर्गत संपूर्ण देशात ४१ दारूगोळा निर्मिती कारखाने आहेत. सुमारे पाच लाख कर्मचारी कार्यरत असून या कारखान्यांमध्ये दारूगोळा व शस्रांस्रांच्याबरोबरच संरक्षण मंत्रालयासाठी आवश्यक विविध उत्पादनांचे उत्पादन करण्यात येते. या सर्व दारूगोळा निर्मिती कारखान्यांत दर वर्षी सुमारे ५२ हजार कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्मिती केली जात आहे. मात्र केंद्र सरकार या कारखान्यांचे करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असल्याने देशभरात विविध मार्गानी आंदोलन सुरु करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
इंटक, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, टीयुसीसी, जेडब्लूएम,एआयएएनजीओ या सर्व संघटनांच्या पदाधिकारी व कामगारांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला.