पिरंगुट कारखाना अपघाताच्या व्यापक चौकशीसाठी कामगार संघटनांकडून तज्ञ समितीची नेमणूक

पुणे : पिरंगुट येथील एस्.व्ही.एस्. टेक्नॉलाजीज् या कारखान्यातील भीषण आगीमध्ये १७ कामगारांचा बळी गेला. या निमित्ताने एकूणच औद्योगिक सुरक्षा कायद्यांच्या तसेच कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीचे व तपासणी यंत्रणेच्या भ्रष्ट व्यवहाराचे मूलभूत मुद्दे ऐरणीवर आले आहेत. त्याची व्यापक चौकशी करून त्या बाबतची वस्तुस्थिती समाजासमोर आणण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने तज्ञांचा समावेश असणाऱ्या चौकशी समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे.          

या समितीचे अध्यक्ष म्हणून आयएलएस् संस्थेच्या प्रख्यात लॉ कॉलेजमधील सामाजिक कायद्यातील तज्ञ डॉ.नितेश नवसागरे काम पाहणार असून सचिव म्हणून ऍडव्होकेट विशाल जाधव काम पाहतील. मानव संसाधन व्यवस्थापन तज्ञ विवेक पटवर्धन, सुरक्षा तज्ञ माळवदकर आणि सामाजिक संशोधिका रोमा मकाथी ह्यांचाही समावेश या समितीमध्ये असेल. 

कारखाना अधिनियम, कंत्राटी कामगार अधिनियम, कामगार राज्य विमा योजना, कामगार नुकसानभरपाई कायदा इत्यादी अनेक कायद्यांतर्गत ज्या अंमलबजावणी यंत्रणा निर्माण करण्यात आलेल्या आहेत, त्यांचे काम नेमके कसे चालते, खरोखर त्या प्रामाणिक, सक्षम आणि विश्वासार्ह आहेत काय?, इतके बेबंद कंत्राटीकरण वाढण्यामागे या यंत्रणांची भागीदारी जबाबदार आहे काय?, त्यांचे नियंत्रण आणि मार्गदर्शन कारखान्यांच्या व्यवस्थापनांवर असते  की फक्त ‘अर्थ’पूर्ण भागीदारी ?, बहुतेक व्यवस्थापनांचा दृष्टीकोन कामगारांच्या सुरक्षेबाबत इतका निर्घृण आणि बेजबाबदार का दिसतो ?, अशा परिस्थितीमध्ये यावर मात करण्यासाठी काय केले पाहिजे ? असा विषयावर ही समिती चौकशी चे काम करणार असून त्याचा अहवाल ३ आठवड्यात कामगार संघटना संयुक्त समितीला देणार आहे. 

एस व्ही एस टेक्नॉलाजीज् कंपनीला कृती समितीच्या प्रतिनिधींनी घटना स्थळाची पाहणी केली अपघात अतिशय भीषण होता सर्व जळालेल्या वस्तूंचा तेथे खच पडला होता. या प्रसंगी कॉम्रेड किरण मोघे, दत्ता येळवंडे, शांताराम कदम, किशोर ढोकले, विशाल जाधव, वसंत पवार, दिलीप पवार, अनिल रोहम उपस्थित होते.