डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाणगाव जवळील डेहणे-पळे येथील विशाल फटाका कंपनीत गुरुवारी (दि.१७ जून) सकाळी मोठा स्फोट झाला. कारखान्यात काम करणारे १० कामगार गंभीर जखमी झाले असून २० हून अधिक कामगार किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना कुटीर रुग्णालय डहाणू, खासगी दवाखाने, वापी येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे असे वृत्त हिंदुस्थान समाचार वृत्त संस्थेने दिले आहे.
डहाणू-चारोटी मुख्य राष्ट्रीय महामार्गापासून १५ किमी अंतरावर जंगलात ही कंपनी आहे. स्फोटानंतर मोठी आग लागली. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की डहाणू शहरालाही हादरे बसले. आजूबाजूच्या १५ ते २० किलोमीटर अंतरावरील घरांनाही हादरे बसले. धुराचे लोट २२ किलोमीटर अंतरावरून दिसत होते.
डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डेहणे पळे येथे कारखान्यात वेल्डिंगचे काम करत असताना ठिणगी उडून ही आग लागली आणि त्यात कारखाना जळून खाक झाला आहे.
फटाके कारखान्याला आग लागून झालेल्या भीषण स्फोटात आगवण, डेहणे, पळे, आशागड, डहाणू शहर, वाणगाव, देदाळे, साखरे यासह कासा चारोटी परिसरात हादरे बसले असून अनेकांच्या घराचे पत्रे फुटले आहेत. रिलायन्स प्रकल्प, डहाणू नगरपालिका तसेच बोईसरहून अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले, तसेच दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर आग आटोक्यात आली. डहाणू पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेचे वृत कळताच डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, नगराध्यक्ष भरत राजपूत, तहसीलदार राहुल सारंग, आमदार विनोद निकोले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
डेहणे गावात नरेश कर्नावट यांचा फटाके निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यात आगवण, डेहणे पळे, वाणगाव परिसरातील १०० हून अधिक कामगार काम करतात. दिवाळीनिमित्त फटाके तयार करण्यासाठी काही दिवसांपूर्वी कंटेनर भरून फटाके तसेच कच्चा माल आणण्यात आला होता. तसेच किरकोळ फटाके बनवण्याचे काम सुरू असताना वेल्डिंगचे काम करताना उडालेली ठिणगी फटाके साठ्यावर उडून लागलेल्या आगीने काही क्षणात भीषण रूप धारण केले. यावेळी कामगारांनी पळापळ केल्याने सर्व जण वाचले. दरम्यान वेल्डिंग करणारा नवनीत लोटे हा गंभीर जखमी झाला असून त्यास वापी येथील रेम्बो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.