वर्धा : वर्धा येथील मोहता टेक्स्टाईल इंडस्ट्रीला येत्या ६ जूनपासून कायमची बंद होणार आहे. व्यवस्थापकाने तसा बोर्ड कापड गिरणीच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. त्यामुळे ५७० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे असे वृत्त टीव्ही ९ वृत्तसंस्थेने दिले आहे.
हिंगणघाट येथील मोहता इंडस्ट्रीज आरएसआर स्पिनिंग आणि प्रोसेलिंग कापड गिरणी म्हणून ओळखली जाते.आता कंपनीच्या व्यवस्थापकाने दिनांक २२ मे २०२१ रोजी कापड गिरणीच्या प्रवेशद्वारावर येत्या ६ जून २०२१ पासून या कापड गिरणीमध्ये कायमची टाळेबंदी लावण्यात येत आहे अशा सूचनेचा लिखित आदेश लावला. त्यामुळे कामगारांमध्ये खळबळ माजली आहे.
या कापड गिरणीमध्ये एकूण ५७० कामगार होते. त्यातील प्रोसेसिंग युनिट दीड वर्षापासून बंद असल्याने २१० कामगारांना लेऑफ देऊन मॅनेजमेंट या कामगारांना अर्धे वेतन देत होतं. तर इतर ३६० कामगार स्पिनिंग विभागात तीन शिफ्टमध्ये काम करीत होते.
दरम्यान, बोर्डावर लावलेल्या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे की, कापड गिरणी गेल्या अनेक वर्षापासून तोट्यात चालत आहे. मार्च २०२० या आर्थिक वर्षात हा तोटा वाढवून ३४ कोटी २० लाखावर पोहोचला. यामध्ये डिसेंबर २०२० मध्ये १३ कोटी रुपयांची वाढ झाली. सध्यस्थितीत कापड गिरणीवर १०८ कोटी रूपयांचे एकूण देणे असल्याचे सांगण्यात आले. गिरणी चालविण्यासाठी विविध बँकामधून कर्ज घेतले होते.
परंतु, गिरणीची आर्थिक व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असल्याने गेल्या २०१९ पासून गिरणीने राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज आणि हप्ते दोन्ही थकविले आहे. एका बँकेकडून दिलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी कापड गिरणीचा संचालक बोर्ड भंग करून त्याजागी प्रशासकाची नियुक्ती करावी ही कारवाई सुरू केली होती. तसेच इतर बँकेने सुध्दा वसुलीचा तगादा लावला होता. विद्युत महावितरण कंपनीचे एक कोटी ७५ लाख रुपयांचे बिल थकित असल्याने महावितरणकडून गिरणीचा विद्युत पुरवठा सुध्दा पंधरा दिवसा अगोदर बंद करण्यात आला.
७ मेपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित केले. तेव्हापासून कापड गिरणी बंद होती. कापड गिरणीची आर्थिक व्यवस्था चारी बाजूने नाजूक झाली होती. अशावेळी मॅनेजमेंटकडून २२ मे शनिवारी सायंकाळी गिरणीच्या प्रवेशद्वाराच्या बोर्डवर नोटीस लावली. कापड गिरणीत येत्या ६ जून २०२१ पासून कायमची टाळेबंदी करण्यात येत आहे, असं यामध्ये म्हटलं आहे.
अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असून, मिल बंद केल्यास आंदोलन करणार असल्याची घोषणा माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली आहे.