सर्व मोलकरीण महिलांना पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य त्वरीत द्या !

६० वर्षांवरील महिला मोलकरीण यांना देखील आर्थिक सहाय्य देण्यात यावे - कॉ. शंकर पुजारी 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोलकरीण महिलांना कोविड १९ साठी लॉक डाऊन मध्ये तातडीने आर्थिक सहाय्य म्हणून पंधराशे रुपये देण्याचे घोषित करण्यात आलेली आहे. याबद्दल संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे आम्ही स्वागत करीत आहोत.

 कोरोना साथीमध्ये मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासूनच लॉक डाऊन लावला गेला.यामध्ये आजही सर्वात जास्त हाल मोलकरीण महिलांना सोसावे लागत असल्यामुळे त्यांच्यासह त्यांचे कुटुंब आज रोजगार नसल्यामुळे अर्धपोटी जीवन जगत आहेत. त्यांना शासनाकडून मोलकरीण महिला म्हणून काहीही मदत मिळाली नाही. वास्तविक त्यांनाच मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

सन २०११ सालापासून आजपर्यंत ज्या मोलकरणी महिलांनी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये मोलकरीण महिलांच्या साठी असलेले लाभ मिळण्यासाठी नोंदणी केली असेल अशा सर्वांना हे पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. जरी  मोलकरीण महिलांनी २०११ सालानंतर स्वतःच्या काढलेल्या ओळखपत्राचे नूतनीकरण केलेले नसले तरीसुद्धा ३० एप्रिल २०२१ पर्यंत  महिलांनी ओळखपत्र काढलेले असेल त्या सर्वांना हे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

यामध्ये अशी अट घालण्यात आलेली आहे की, ३० एप्रिल २०२१ पर्यंत ज्या मोलकरीण महिलांचे वय ६० वर्षे पूर्ण झालेले असतील त्या महिलांना लाभ मिळणार नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये पाच लाखापेक्षा जास्त मोलकरीण महिलांनी महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याणकारी मंडळाकडे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये नोंदणी केलेली आहे. सर्व कामगार संघटनांची सुरुवातीपासूनच अशी मागणी आहे की, साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मोलकरीण महिलांना पेन्शन मिळाला पाहिजे. परंतु महाराष्ट्र शासनाने पेन्शनचा निर्णय केलेला नाही. 

त्यामुळे महाराष्ट्र शासनाची ही नैतिक जबाबदारी आहे की ज्या महिलानी २०११ पासून सरकारी कामगार अधिकारी कार्यालय मधून ओळखपत्र घेतलेले असेल व नोंदणी केलेली असेल त्यांची जरी ६० वर्षे पूर्ण झाली असली तरी त्या सर्वांना लाभ देणे आवश्यक असून अशी आयटक कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन सांगली सहाय्यक कामगार आयुक्त श्री अनिल गुरव यांना दिले. तरी याबाबत शासनाने सत्वर कारवाई न केल्यास महाराष्ट्रातील मोलकरीण महिलांना टाळेबंदी च्या काळात सुद्धा आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी अशी माहिती महाराष्ट्र घर कामगार मोलकरीण संघटना चे कॉ. शंकर पुजारी यांनी दिली.