ईपीएस ९५ पेन्शनधारक करणार देशव्यापी उपवास आंदोलन

देशांतील विविध महामंडळे, खाजगी उद्योग, सहकार क्षेत्र इत्यादी मध्ये काम केलेल्या सुमारें ६७ लाख ईपीएस ९५ पेन्शनधारक हे गेल्या अनेक वर्षापासून न्यायाचे अपेक्षेत आहेत. या पेन्शन धारकांना  फक्त रुपये ३०० ते ३००० पर्यंत पेन्शन मिळते त्यावर कुठलाही महागाई भत्ता नाही की वैद्यकीय सुविधा नाही.

कमांडर अशोक राऊत यांचे नेतृत्वात या पेन्शनधारकांनी आज पर्यंत राष्ट्रीय संघर्ष समितीचे बॅनरखाली सर्व प्रकारची आंदोलने केलीत, निवेदने दिलीत, संबंधितांच्या भेटी घेतल्यात. आणि सरते शेवटी देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांची देखील  दिनांक ४ मार्च २०२० ला दिल्ली येथे मथुरा खासदार श्रीमती हेमा मालिनी यांचे समवेत भेट घेतली व त्यांना फक्त निवेदनच दिले नाही तर २७ मिनिटे सविस्तर चर्चा देखील केली.  व त्यात मा.पंतप्रधान यांनी या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन पण दिले.  त्यामुळे या पेन्शन धारकांना आशा निर्माण झाली होती की आता आपला प्रश्न निकाली निघेल. मा.केंद्रिय श्रम मंत्री यांचे सुचने वरून संघटनेने सर्व आंदोलने स्थगित केलीत मात्र  संघटनेचे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्रातील बुलडाणा येथे साखळी उपोषण सुरु ठेवलेले आहे. व गेल्या ८८० दिवसापासून हे आंदोलन बुलडाणा येथे सुरू आहे. या आंदोलनाची माहिती दररोज सोशल मीडियावर संबधितांकडे पाठविली जाते व जेव्हा लॉकडाऊन नसेल तेव्हा प्रत्यक्षरित्या मा.जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदन सुद्धा दिले जाते. माञ आजपर्यंत देखील या आंदोलनाची दखल सरकार कडून घेतल्या गेली नाही व पर्यायाने कोरोना च्या या कठीण काळात अनेक पेन्शनधारक सन्मानजनक पेन्शन ची वाट पहात हे जग सोडून गेलेत.

 कोरोना साथीचा रोग गेल्या वर्षीपासून आला होता परंतु या पेन्शनधारकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ईपीएस पेन्शनची महामारी सुरू झाली आहे ज्यात  जवळपास ५००० ईपीएस पेन्शनधारक  जगातून निघून जात आहेत आणि आता कोरोना महामारीमुळे मृत्यूचे प्रमाण आणखी वाढले आहे.

त्यामुळे अजून एक प्रयत्न म्हणून दिनांक १ जून २०२१ रोजी ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी एक दिवसीय राष्ट्र व्यापी उपोषण कार्यक्रम हाती घेतला आहे. या दिवशी देशांतील ६७ लाख पेन्शन धारक आपआपल्या घरी आपल्या कुटुंबीया सोबत सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपवास करतील. व त्यानंतर या उपवास आंदोलनाचा आपला फोटो त्यांचे त्यांचे लोकसभा मतदार संघातील खासदार तसेच मा.पंतप्रधान यांना ई-मेल वरून, व्हॉट्सॲप वरून, ट्विटर वरुन पाठवतील व आपल्या भावना व्यक्त करुन न्याय् मिळवून देण्यासाठी विनंती करतील.  या आंदोलनात सध्या कार्यरत असलेल्या कामगारांनी सुद्धा त्यांचे उज्वल भवितव्यासाठी भाग घ्यावा असे आवाहन संघटनेने केले आहे. जे वृध्द आजारी पेन्शन धारक असतील त्यांनी उपवास न करता प्रार्थना करावी असेही आवाहन करण्यात आले आहे. 

या आंदोलनाची नोटीस राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी मा.पंतप्रधान, श्रम मंत्री, वित्तमंत्री यांना पाठविली आहे.तरी सर्व ईपीएस ९५ पेन्शनधारक व कार्यरत कर्मचारी यांनी हे उपोषण आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.