स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना यांनी केली शासनाकडे मागणी
महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी कायमस्वरुपी स्वतंत्र्य रुग्णालयाची निर्मिती व्हावी अशी मागणी स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना यांनी शासनाकडे केली असून याबाबत मुख्यमंत्री, कामगार मंत्री यांना पत्रव्यवहार केला असल्याची माहिती संघटना अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी दिली.
कोरोना महामारीची भयावह परिस्थिती संपुर्ण महाराष्ट्र अनुभवत असताना या कोरोनामुळे अनेक बांधकाम कामगारांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागत आहे. सध्या स्थितीत राज्यातील बांधकाम कामगारांची अवस्था बिकट असुन त्यांचे आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. बांधकाम कामगार व त्याचा परिवार आयुष्य जगण्यासाठी रोजगाराच्या शोधात भटकत असतो. हाताला मिळेल ते काम असेल त्या परिस्थितीत करतो. त्यांना अनेकदा दुर्गंधी व थोकादायक परिस्थितीतही काम करावे लागते. अशा परिस्थितीत गंभीर आजार जडल्यास त्यांना मोठ्या रुग्णालय मध्ये उपचार घेता येत नाही. त्यामुळे अनेक गरीब कामगारांना आपला जीव गमवावा लागत आहे.
महाराष्ट्र राज्य इमारत व इतर कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातुन राज्यातील बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने २००७ मध्ये इमारत बांधकाम कामगार मंडळाची स्थापना केली. या मंडळाकरिता नोंदणीकृत कंत्राटदारांकडुन १ टक्का उपकर लावून राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणकरिता निधी एकत्र करणे सुरु केले. त्या उपकाराच्या स्वरुपात मंडळाकडे जवळपास रु. ११,००० /- कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे. त्या प्रमाणात राज्यातील कामगारांवर होत असलेला खर्च नगण्य आहे असे अग्निहोत्री यांनी सांगितले.
सध्याचा कोरोनाची भयवाह स्थितीत लक्षात घेता व पुढे देखील कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करुन महाराष्ट्रतील किमान प्रत्येक विभागावर नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी कायमस्वरुपी स्वतंत्र्य रुग्णालय निर्माण करावे त्यामुळे राज्यातील कामगारांना मोठा दिलासा मिळेल सदर रुग्णालय निर्मिती करिता शासनाच्या तिजोरीतुन कुठलीही तरतुद करण्याची गरज नाही. मंडळाकडे असलेल्या रक्कमेच्या वापर करुन राज्यातील नोंदणीकृत बाधकाम कामगारांकरिता प्रत्येक विभागावर रुग्णालयाची निर्मिती करावी अशी मागणी स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना यांनी केली आल्याची माहिती अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी दिली.