महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त श्रमकल्याण युग मासिकाचे प्रकाशन
मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे श्रमकल्याण युग हे मासिक राज्याच्या कामगार विभागाचे प्रतिनिधित्व करणारे असावे. ज्यातून कामगार, मालक, शासन यांच्यामध्ये समन्वय साधण्यात येईल, असे मत कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त श्रमकल्याण युग मासिकाचे प्रकाशन आणि १० वी व १२ वी च्या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त ११२ कामगार पाल्यांचा गुणगौरव सोहळा ऑनलाईन आयोजित (दि.१ मे) करण्यात आला होता. त्यात श्री.मुश्रीफ यांनी लिखित संदेश पाठवून आपले मत व्यक्त केले.
कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता सिंघल यांच्या हस्ते मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, कामगार उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार, कल्याण आयुक्त रविराज इळवे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोडबोले, मीडिया आर अँड डी.चे संचालक दिलीप कवळी, सुप्रसिद्ध करिअर काऊंसिलर स्वाती साळुंखे आदी मान्यवर यावेळी ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्यूब आणि फेसबुकवर करण्यात आले.
श्री.मुश्रीफ यांनी सांगितले की, कोरोना काळात शासन कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे असून कामगारांना कामावरुन कमी न करण्याबाबत उद्योगांना आवाहन करण्यात आले आहे. कामगारांना मोफत शिवभोजन थाळी आणि जीवनावश्यक वस्तू पुरविणे, प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.
कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले की, देशासाठी शेतकरी जेवढे महत्त्वाचे आहेत, तेवढेच महत्त्वाचे कामगार आहेत. कामगारांचे हात ज्या दिवशी थांबतील त्या दिवशी संपूर्ण देश ठप्प होऊ शकतो. या कामगारांना त्यांच्या श्रमाची प्रतिष्ठा मिळायला हवी. त्यादृष्टीने शासन योजना आखत आहे. नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यात राज्य शासनाने प्रत्येकी १५०० रुपये जमा केले असून अशी योजना राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. घरेलू कामगारांनादेखील राज्य शासन आर्थिक मदत करणार असल्याची माहिती श्री.कडू यांनी दिली.
श्रीमती सिंघल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, येणाऱ्या काळात माहिती आणि ज्ञान हीच मुख्य आयुधे असतील. त्यामुळे ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्याचा रोड मॅप आताच तयार करा आणि त्या दिशेने वाटचाल करा. इंटरनेटवर खूप माहिती उपलब्ध आहे. त्याचा वापर सजगतेने करावा. मंडळाने विद्यार्थ्यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या. प्रसिद्ध करिअर काऊंसिलर स्वाती साळुंखे यांचेतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले. सूत्रसंचालन सहायक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे यांनी केले. आभार प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी मनोज बागले यांनी व्यक्त केले.