सांगली जिल्हा आयटक कामगार संघटना वतीने नियोजन
सांगली : पाच मे कार्ल मार्क्स २०० वी जयंतीनिमित्त सांगली निवारा भवन येथे कार्ल मार्क्स यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याचे नियोजन सांगली जिल्हा आयटक कामगार संघटना यांच्या वतीने करण्यात आले होती अशी माहिती संघटना जनरल सेक्रेटरी कॉ. शंकर पुजारी यांनी सांगितले.
कार्ल मार्क्स व एंगल्स यांनी १८४७ मध्ये कामगार चळवळी साठी भूमिका म्हणून कम्युनिस्ट जाहिरनामा जाहीर केला. आणि आवाहन केले की जगातील कामगारांनो एक व्हा ! तुम्ही एक झाल्यास तुमच्या पायातील बेड्या गळून पडतील आणि जिंकण्यासाठी मात्र तुम्हाला सगळे जग आहे. कारण १८४७ सालच्या दरम्यान जगामध्ये जसा भांडवलशाहीचा विकास होत होता. तसेच दुसऱ्या बाजूस युरोप खंडामध्ये कामगारांचे आत्यंतिक शोषण केले जात होते. त्यांना बारा तास सोळा तास दररोज काम करावे लागत असे आणि केलेल्या कामाचा मोबदला अत्यंत कमी मिळत असे अशा वेळेस जगातील कामगारांनी संघटित होऊन न्याय मिळवून घेण्यासाठी कार्ल मार्क्स यांनी महत्वाचा संदेश दिला.
आज जगामध्ये अगदी प्रगत देशातील सुद्धा अभ्यासक जागतिक विकासासाठी समाजवाद हाच पर्याय आहे असे ठामपणे सांगतात. मार्क्सवाद व मार्क्स चे मूळ तत्त्वज्ञान हे मनुष्य केंद्रित आहे. त्यामुळे भांडवल आधारित व्यवस्थेने म्हणजेच भांडवलशाहीने नफ्यासाठी मानवी हिताकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे जगभर आर्थिक विषमता वाढत जाऊन भांडवलशाही आर्थिक मंदीच्या चक्रामध्ये अडकत चालली होती व आहे. आजही जगामध्ये एक टक्के लोकांच्या कडे देशातील पन्नास टक्के संपत्ती आहे. भारतामध्ये तर एक टक्का व्यक्तींच्या कडे ७७ टक्के संपत्ती आहे.
एकीकडे प्रचंड प्रमाणात होणारे उत्पादन व उत्पादन शक्तीची वाढ दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वाढणारी विषमता व बेरोजगारी हे सध्या न सुटणारे प्रश्न बनले आहेत. या सर्व समस्या संबंधी जग कसे बदलायला हवे याबाबतचे मार्गदर्शन जगाला कार्ल मार्क्स यांनी दिलेले आहे. कार्ल मार्क्स यांच्यासंबंधी बोलताना कॉम्रेड शंकर पुजारी यांनी वरील विचार व्यक्त केले. यावेळेस कॉ सुमन पुजारी, कॉ विजय बचाटे, कॉ वर्षा गडचे, कॉ विशाल बडवे इत्यादी उपस्थित होते.