महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडील नोंदीत बांधकाम कामगारांकरिता रुपये १,५००/- अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार
मुंबई : मुख्यमंत्री यांनी दिनांक १३ एप्रिल रोजी राज्यातील विविध घटकांना अर्थसहाय्य घोषित करताना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडील नोंदीत बांधकाम कामगारांकरिता रुपये १,५००/- अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घोषित केला होता.
त्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी १,५००/- रुपयांचे अनुदान देण्यात येईल अशी घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती.
त्यानुसार महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाने अर्थसहाय्य्य वाटपास मान्यतेसाठी प्रस्ताव शासनास सादर केला यावरती कामगार विभागाने दिनांक २२ एप्रिल २०२१ पूर्वी नोंदीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये १,५००/- इतके अर्थसहाय्य थेट बँकेत जमा करण्याचा प्रस्तावास मान्यता दिलेली आहे.
मागील लॉकडाउन कालावधीमध्ये देखील राज्यशासन व मंडळाच्या माध्यमातून नोंदीत बांधकाम कामगारांना पहिल्या टप्प्यात रुपये २,०००/- व दुसऱ्या टप्प्यात रुपये ३,०००/- असे एकूण रुपये ५,०००/-एवढे अर्थसहाय्य बांधकाम कामगारांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आले होते याचा फायदा जवळपास दहा लाख बांधकाम कामगारांना झाला होता.