अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
अहमदनगर प्रतिनिधी- राज्य सरकारने कारखानदारांना कारखानदारी सुरू ठेवण्यास परवानगी दिली असल्यामुळे कोरोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहत कोरोना संसर्ग काळात काही दिवस बंद ठेवून कामगारांसाठी ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर उभारावे असे मागणीचे निवेदन अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, किरण दाभाडे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले.
यावेळी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे म्हणाले कि, एका कारखान्यामध्ये एकाच वेळी शंभर ते एक हजार कामगार काम करत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे कामगारांना कोरोना विषाणूची झपाट्याने लागण होत आहे त्याच बरोबर कोरोना विषाणू हा संसर्गजन्य आजार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना देखील संसर्ग होत आहे. काही कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे यासाठी काही कालावधीसाठी कारखानदारी बंद ठेवणे गरजेचे आहे.
कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे कामगारांना उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जागा उपलब्ध होत नाही, त्याचबरोबर ऑक्सिजनचा ही तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. उपचाराअभावी कामगारांचा दुर्दैवी मृत्यू होऊ नये यासाठी नगर एमआयडीसी मध्ये सुसज्ज असे ऑक्सिजनयुक्त कोवीड सेंटर उभारावे अशी मागणी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी केली आहे.
यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष व कामगार नेते किरण दाभाडे म्हणाले की, एमआयडिसी मधील सर्व उद्योजकांनी एकत्रित येऊन कोरोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करावी संकट काळामध्ये प्रत्येकाने हातभार लावावा यासाठी उद्योजकांनी आपल्या कारखान्यातील कामगारांना पगारी सुट्टी द्यावी व कामगार कायद्याचे पालन करावे यासाठी एक विशिष्ट अशी समिती नेमावी जेणेकरून कुठल्याही कामगाराला कारखानदार कमी करू शकणार नाही त्यांना त्यांचे पूर्ण वेतन मिळावे या समितीमार्फत औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या अडचणी सोडवण्यात येतील अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रविंद्र पडदे यांच्या कडे देण्यात आले.