मुंबई : कारखान्यांमधील अपघात टाळण्यासाठी कारखान्यातील सुरक्षा अधिकारी यांना विभाग प्रमुखाचा दर्जा मिळावा याबाबत नुकतेच औद्योगिक व आरोग्य सुरक्षा संचालनालय यांनी अपर /सहसंचालक यांना निर्देश दिले आहेत.
कारखान्यात अपघात होऊन जीवित व वित्त हानी होऊ शकते असे अपघात टाळण्यासाठी मोठ्या कारखान्यांमध्ये सुरक्षा अधिकारी नेमण्याची तरतूद कारखाने अधिनियम १९४८ च्या कलम ४० बी मध्ये करण्यात आलेली आहे तसेच त्यांना औद्योगिक सुरक्षा विषयक बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी म्हणून महाराष्ट्र सुरक्षा अधिकारी (कर्तव्ये, पात्रता आणि सेवेच्या अटी) नियम, १९८२ च्या नियम ७ (२) प्रमाणे त्यांना विभाग प्रमुखाचा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे व ते सर्व प्लांट हेड / सीईओ यांच्या अधिपत्याखाली काम करतील असे नमूद केले आहे.
काही कारखान्यातील सुरक्षा अधिकारी हे या एच.आर विभागाच्या अधिपत्याखाली काम करतात त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे सुरक्षाविषयक बाबींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेता येत नाही, त्यामुळे कारखान्यातील अपघात टाळण्याकरता त्यांचा पुरेसा उपयोग होताना दिसून येत नाही.
तरी सर्व अपर / सहसंचालक यांना सुचित करण्यात आले कि, त्यांनी आपल्या कार्य क्षेत्रातील संबंधित कारखान्यांना सुरक्षा अधिकारी बाबतचा तरतुदी लागू होतात अशा कारखान्यांमध्ये सुरक्षा अधिकारी नेमण्याबाबत व त्यांना कारखान्यातील इतर विभाग प्रमुख प्रमाणे सुरक्षा विभाग प्रमुख याचा दर्जा देण्याबाबत संबंधित कारखान्यांना सूचना करण्यात याव्या. तसेच पाठपुरवठा करून सदर बाबतची पूर्तता करून घेण्यात यावी जेणेकरून कारखान्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे निर्देश औद्योगिक व आरोग्य सुरक्षा संचालनालय तर्फे देण्यात आले.