गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन

Mill worker leader Datta Iswalkar passes away

मुंबई : गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचं काल (दि.७ एप्रिल) सायंकाळी निधन झालंय. वयाच्या ७२व्या वर्षी दीर्घ आजाराशी संघर्ष करत असताना मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (८ एप्रिल) सकाळी वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. बुधवारी सकाळी मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना जे. जे .रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यापश्चात पत्नी चार मुले नातवंडे असा परिवार आहे.

मुंबईतील गिरणी कामगारांसाठी दोन ऑक्टोबर १९८९ पासून इस्वलकर यांनी संघर्ष करण्यास सुरुवात केली. याच दिवशी गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली.

ते आजपर्यंत समितीचे अध्यक्ष होते. बंद पडलेल्या दहा गिरण्या १९८८ - ९० च्या दशकात त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू केल्या. नंतर त्यांनी गिरणी कामगारांना स्वेच्छानिवृत्ती पोटी चांगले पैसे मिळवून दिले.

गिरण्यांच्या जागेवर कामगारांना घरे आणि रोजगार मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी १९९९ पासून आजपर्यंत संघर्ष केला. आयुष्यभर कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष, अनेकांना हक्काचं घर मिळवून दिलं दत्ता इस्वलकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गिरणी कामगारांसाठी काम केलं. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि लढ्यामुळे मार्च २०१२ मध्ये गिरणी कामगारांच्या घरांची पहिली सोडत (लॉटरी) काढण्यात आली. १ लाख ७५ हजार गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केला. यापैकी १५-२० हजार कामगारांना त्यांनी आत्तापर्यंत त्यांची हक्काची घरं मिळवून दिली. उर्वरित कामगारांच्या घरांसाठी देखील ते संघर्ष करत होते.