मृत कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई तसेच व्यवस्थापकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून देण्याची मागणी

श्री दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ येथे कामगार साखर कारखान्याच्या पर्यावरण विभागातील अन अरोबिक पाण्याच्या टाकीची सफाई करताना टाकीत गॅस तयार झाल्याने टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे. यामध्ये राजेश ठोमके, गोपाळ जंगम व संदीप कांबळे यांचा मृत्यू झालेला आहे. 

कामगारांचा टाकीतच मृत्यूला साखर कारखान्याचा गलथान कारभार जबाबदार आहे. हे धोक्याचे काम करीत असताना या कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने दिलेली नव्हती. तसेच इतर आवश्यक साधने न दिल्यामुळे ही गंभीर घटना घडलेली आहे. कारखान्याच्यां व्यवस्थापकांनी ही आवश्यक सुरक्षा साधने पुरवली असती तर हा अपघात झाला नसता. व तीन कामगारांचा बळी केला नसता. म्हणूनच कारखाना अधिनियम कायद्याखाली आणि IPC कायद्याअंतर्गत श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांवरती त्वरित सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच मृत कामगारांच्या कुटुंबातील वारसांच्या पैकी तिघांना साखर कारखान्यांमध्ये कायम नोकरी देण्यात यावी. शिवाय कुटुंबातील वारसांना साखर कारखाना मार्फत प्रत्येकी वीस लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना फेडरेशन AITUC जनरल सेक्रेटरी कॉ शंकर पुजारी यांनी केली 

तसेच याबाबत ईमेल द्वारे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख व सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन पाठवून दिले आहे, याबाबत प्रत्यक्ष मोबाईल वरून सहाय्यक कामगार आयुक्त श्री अनिल गुरव यांना तक्रार सांगितली आहे अशी माहिती शंकर पुजारी यांनी दिली.