कामगार कल्याण मंडळाच्या 'गंभीर आजार उपचार सहाय्यता" या योजनेत "कोरोना" या आजाराचा समावेश करावा - शिवाजीराव खटकाळे

कोरोना संसर्गाचा वाढत प्रादुर्भाव पाहता कोरोना या आजारामुळे अनेक कामगार कुटुंबियांना आर्थिक हानी होत आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यातील कामगार वर्गाच्या सर्वांगीण उन्नती व प्रगतीसाठी विविध योजना व उपक्रम आयोजित केले जातात यामध्ये गंभीर आजार उपचार सहाय्यता या योजनेचा देखील समावेश असून यामध्ये कोरोना या आजाराचा समावेश करावा अशी मागणी कामगार नेते, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांनी केली आहे.

शिवाजीराव खटकाळे म्हणाले कि, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळला कामगारांच्या पगारामधून कपात करून तसेच मालकवर्ग देखील त्याप्रमाणामध्ये रक्कम भरून मंडळाला मोठा निधी उपलब्ध करून दिला जातो यातून कामगार कल्याण मंडळ लाखो कामगारांसाठी विविध योजना राबविते यामध्ये गंभीर आजार उपचार सहाय्यता या योजने अंतर्गत कामगार किंवा त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, आईवडील यांना मूत्रपिंड, कर्करोग, हृदयरोग, एड्स, क्षय, यांसारख्या असाध्य आजार व शस्त्रक्रियेसाठी सदर योजनेच्या माध्यमातून औषधोपचाराकरिता आर्थिक मदत देण्यात येते. योजनेमध्ये कोरोना या आजाराचा समावेश करावा त्याकरिता उपमुख्यमंत्री, कामगारमंत्री, कामगार प्रधान सचिव, कामगार आयुक्त यांना पत्र देऊन याबाबत मागणी करण्यात आली असल्याचे  शिवाजीराव खटकाळे यांनी सांगितले.